आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायर फेरीतील 15वा सामना रविवारी (दि. 25 जून) श्रीलंका विरुद्ध आयर्लंड संघात पार पडला. हा सामना श्रीलंका संघाने तब्बल 133 धावांनी जिंकला. सामना जिंकण्यासोबतच श्रीलंकेचा प्रतिभावान फिरकीपटू वनिंदू हसरंगा यानेही धारदार गोलंदाजीच्या जोरावर खास विक्रम नावावर केला. तो अशी कामगिरी करणारा जगातील दुसराच गोलंदाज बनला.
या सामन्यात आयर्लंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्व विकेट्स गमावत 325 धावा केल्या होत्या. श्रीलंकेच्या 326 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंड संघाचा डाव 31 षटकात 192 धावांवरच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. त्यामुळे श्रीलंकेने हा सामना 133 धावांनी खिशात घातला. आयर्लंडच्या 10 पैकी 5 विकेट्स या एकट्या वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने घेतल्या होत्या. अशी कामगिरी करताच त्याने खास विक्रम नावावर नोंदवला.
वनिंदू हसरंगा याने सलग तिसऱ्या सामन्यात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स (Wanindu Hasaranga 5 Wickets Haul In Consecutive 3 Matches) घेतल्या आहेत. त्यामुळे तो वनडे क्रिकेटमध्ये सलग तीन सामन्यात पाच विकेट्स घेणारा जगातील दुसराच गोलंदाज बनला आहे. विशेष म्हणजे, हसरंगा हा तीन सामन्यात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा जगातील पहिलाच फिरकीपटू आहे. ही कामगिरी करताच त्याने पाकिस्तानचा गोलंदाज वकार युनूस याची बरोबरी केली आहे. त्याच्या नावावर सलग तीन वनडेत पाच विकेट्स घेण्याचा विक्रम होता.
आयसीसी विश्वचषक क्वालिफायर 2023मध्ये वनिंदू हसरंगाचे प्रदर्शन
6/24- विरुद्ध- यूएई
5/13- विरुद्ध- ओमान
5/79- विरुद्ध- आयर्लंड
वनिंदू हसरंगाची कारकीर्द
हसरंगाच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने श्रीलंकेकडून आतापर्यंत 4 कसोटी, 43 वनडे आणि 58 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, वनडेत 4.95 च्या इकॉनॉमी रेटने 56 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त टी20त त्याने 6.89च्या इकॉनॉमी रेटने 91 विकेट्स घेतल्या आहेत. (cricketer wanindu hasaranga become first spinner who take three consecutive five wicket hauls in odi)
महत्वाच्या बातम्या-
अनुभवी ईशांतने ‘या’ तीन गोलंदाजांना म्हटले भारताचे भविष्य, कोण आहेत ते नशीबवान?
अर्रर्र, असं कुणासोबतच होऊ नये! बॉलरने ज्या सामन्यात घेतलेली हॅट्रिक, त्यातच पडले एका ओव्हरमध्ये 6 सिक्स