कोणताही खेळ असो, तो जितका आनंद घेऊन खेळला जातो तितक्याच वेळा त्यामध्ये काही गंभीर क्षण देखील येतात. खेळात नेहमी एक संघ विजयाचा आनंद घेत असतो तर, दुसर्या बाजूला पराभूत संघ हताश झालेला दिसतो. चाहत्यांशी देखील अशीच परिस्थिती असते. परंतु, कधी कधीतरी मैदानावर हार-जीत यापेक्षाही अनेक मोठे दुःखद प्रसंग उद्भवतात. या प्रसंगामुळे सर्व क्रीडाजगत हळहळते.
अशाच प्रकारे क्रिकेटच्या मैदानावर बरेचदा दुःखद घटना घडल्या आहेत. काहींना गंभीर दुखापती झाल्या तर, काहीवेळा खेळाडूंवर हल्ले देखिल झाले. अशा घटनांमध्ये काही खेळाडूंना आपला जीव देखील गमवावा लागला. आज आपण क्रिकेट मैदानात प्राणाला मुकलेल्या तीन खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.
१) रमण लांबा- चालु सामन्यात दुखापत झाल्याने मृत्युमुखी पडणारा पहिला प्रसिद्ध खेळाडू म्हणजे भारताचे रमण लांबा होत. लांबा यांनी भारतासाठी ३२ वनडे व ४ कसोटी सामने खेळले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते दिल्लीचे प्रतिनिधित्व करत.
बांगलादेशमधील एका सामन्यात फॉरवर्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत असताना, फलंदाजाने मारलेला चेंडू लांबा यांच्या डोक्यावर येऊन लागला. उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते केवळ ३८ वर्षांचे होते.
२) वसीम राजा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावलेला एखादा प्रसिद्ध खेळाडू मैदानावर मृत्युमुखी पडण्याची दुसरी घटना २००७ मध्ये घडलेली. पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेले वसीम राजा यांना २००६ मध्ये सरेसाठी खेळत असताना मैदानावर हृदयविकाराचा झटका आल्याने जीव गमवावा लागला होता. राजा त्यावेळी ५४ वर्षांचे होते.
वसीम राजा यांनी १९७०-१९८० च्या दशकात पाकिस्तानसाठी ५७ कसोटी सामने खेळताना २८०० धावा बनवल्या होत्या. त्यांनी काही काळ आयसीसीसाठी सामनाधिकारी म्हणून देखील काम पाहिलेले. पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा यांचे ते बंधू होते.
३) फिल ह्यूज- ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज फिल ह्यूज हा मैदानावर दुखापत झाल्याने मृत्युमुखी पडलेला सर्वात तरुण खेळाडू ठरला. सन २०१४ मध्ये शेफिल्ड शिल्डच्या सामन्यादरम्यान न्यू साउथ वेल्ससाठी खेळत असताना सीन ऍबॉटचा चेंडू त्याच्या डोक्यावर आदळला होता. दोन दिवस तो हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत राहिला. परंतु, यामध्ये तो अपयशी ठरला.
मृत्युसमयी २६ वर्षाचा असलेल्या फिल ह्यूजने ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी तर २५ वनडे सामने खेळले होते. त्याची प्रतिभा पाहून त्याला ऑस्ट्रेलियाचा भविष्यातील कसोटी कर्णधार म्हणून देखील पाहिले जात.
महत्वाच्या बातम्या-
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिकिटाची किंमत गगनाला भिडली, मोजावे लागणार इतके पैसे
आता रणजी खेळाडू देखील होणार करारबद्ध? आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी माजी फलंदाजाचा सल्ला
विस्डेनने इंग्लंडविरुद्धच्या विश्व एकादशची केली घोषणा, भारतीय खेळाडूंचे संघात वर्चस्व