आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान बांग्लादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान दुखापतग्रस्त झाला. त्याला स्ट्रेचरच्या सहाय्यानं मैदानाबाहेर नेण्यात आलं.
मुस्तफिजुरला क्रॅम्पचा त्रास होत होत होता, त्यामुळे त्याला अर्ध्या सामन्यातच मैदान सोडावं लागलं. मुस्तफिजुरच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्ज साठी चिंता वाढली आहे. कारण हा डाव्या हाताचा गोलंदाज आगामी आयपीएल हंगामात एमएस धोनीच्या संघाकडून खेळणार आहे.
बांग्लादेशच्या चितगाव येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात मुस्तफिजुर रहमाननं नऊ षटकं टाकली. या दरम्यान त्यानं 39 धावा देत सदिरा समरविक्रमा आणि चारिथ असलंका यांच्या विकेट्स घेतल्या. तो आपलं अंतिम षटक टाकत होता, जे श्रीलंकेच्या डावातील 48 वं षटक होतं. परंतु क्रॅम्पमुळे तो हे षटक पूर्ण करू शकला नाही. त्याच्या जागी सौम्या सरकारनं षटक पूर्ण केलं.
मुस्तफिजुर रहमानच्या दुखापतीचं गांभीर्य किती? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु चेन्नई सुपर किंग्जला आशा आहे की हा वेगवान गोलंदाज आयपीएलपूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होईल. सीएसकेनं मुस्तफिजुरला लिलावादरम्यान 2 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. त्याच्याकडे जखमी मथिशा पाथिरानाचा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे.
श्रीलंकेचा मथिशा पाथिराना काही काळापासून जखमी आहे. तो बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही खेळला नाही. चेन्नई सुपर किंग्जसाठी डेथ ओव्हर्समध्ये पाथीरानानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळीही त्याच्याकडून तशीच अपेक्षा होती. मात्र, दुखापतीमुळे तो पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळण्याची खात्री नाही. त्यामुळेच संघ मुस्तफिजुर रहमानकडे पर्याय म्हणून पाहत होता. मात्र आता त्याच्या दुखापतीनेही अडचणी वाढल्या आहेत. पाच वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स या हंगामातील पहिल्या सामन्यात 22 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध भिडेल. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जबरदस्त! राशिद खानचा ‘नो लूक’ षटकार, चेंडू सरळ मैदानाबाहेर!
“कर्णधार बनल्यानंतर रोहित शर्माशी बोलला का?”, हार्दिक पांड्याचं उत्तर ऐकून बसेल धक्का!
CSK vs RCB सामन्याच्या तिकिटांसाठी चाहत्यांची चढाओढ, बुकिंग सुरू होताच वेबसाइट क्रॅश