आयपीएलचा १३ व हंगाम कोरोना विषाणूमुळे भारताऐवजी युएईमध्ये खेळला जात आहे. या स्पर्धेची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. अबू धाबीच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात या हंगामातील पहिला सामना खेळला जाईल.
चेन्नई सुपर किंग्जसाठी हा हंगाम अजून सध्यातरी कठीण असल्याचे दिसते. कारण यूएईमध्ये दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी या संघाचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर या सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी आपली नावे या हंगामातून मागे घेतली. जी या संघासाठी मोठी धक्कादायक बाब असल्याचे समजते.
चेन्नई सुपर किंग्ज हा एक बलाढ्य संघ आहे. या संघाने ८ वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. त्यामुळेच या लेखात अशा ३ कारणांबद्दल जाणून घेऊ, यामुळे सुरेश रैना आणि हरभजन सिंगशिवाय हा संघ आयपीएल २०२० चे विजेतेपद जिंकू शकतो. या संघाच्या काही बाजू खूप मजबूत दिसत आहेत. त्या संघाला विजेतेपदापर्यंत नेऊ शकतील.
१. एमएस धोनी आहे संघाचा कर्णधार
आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जच्या यशामध्ये संघाचा कर्णधार एमएस धोनीचा मोठा हात आहे. धोनीला आपल्या खेळाडूंकडून १००% काम करून घेण्याची चांगली कला अवगत आहे. त्याने कठीण प्रसंगी घेतलेले निर्णय बऱ्याचदा संघाच्या बाजूने लागले आहेत. ज्यामुळे त्याच्या संघाला सतत यश मिळाले आहे.
एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत १० हंगामांपैकी ८ वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर प्रत्येक हंगामात त्याचा संघ बाद फेरीपर्यंतचा प्रवास करत आहे. यासह या संघाने ३ वेळा आयपीएल विजेतेपदही आपल्या नावावर केले आहे.
धोनीने भारतीय संघालाही बरेच यश मिळवून दिले आहे. त्याने आयसीसीचे ३ मोठे चषक भारताला जिंकून दिले आहेत. ही संघासाठी जमेची बाजू आहे.
२. संघात आहेत उत्तम फिरकीपटू
यावेळी आयपीएल २०२० युएईमध्ये होणार आहे. जेथे खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांच्या बाजूने असतात. यामुळे ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील त्या संघाची आयपीएल जिंकण्याची शक्यता बरीच वाढेल. कारण त्यांच्या फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळेल.
जर आपण चेन्नई सुपर किंग्जबद्दल विचार केला तर या संघात बरेच चांगले फिरकीपटू आहेत. त्यातील हरभजन सिंगने आता आयपीएलमधून माघार घेतली आहे. असं असूनही या संघाची फिरकी गोलंदाजी खूप मजबूत दिसते.
चेन्नई सुपर किंग्जकडे रविंद्र जडेजा, इम्रान ताहिर, मिशेल सेंटनर, कर्ण शर्मा, पियुष चावला, केदार जाधव आणि आर साई किशोर असे फिरकी गोलंदाज आहेत. ज्यांना युएईच्या खेळपट्टीवर कोणताही फलंदाज त्रास देण्याची व बाद करण्याची क्षमता आहे.
३. संघात फिरकी गोलंदाजीचा सामना करणारे आहेत फलंदाज
यूएई मधील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना मदत करणारी आहे. म्हणून जेव्हा खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना उपयुक्त ठरते तेव्हा संघात फिरकी गोलंदाजीचा सामना करणारे खेळाडू असणे आवश्यक आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघात असे खेळाडू आहेत ज्यांना फिरकी गोलंदाजी कशी खेळायची हे चांगले माहित आहे.
चेन्नई संघात असे अनेक अनुभवी फलंदाज आहेत. ज्यांनी बऱ्याचदा यशस्वीपणे फिरकी गोलंदाजांचा सामना केला आहे. यात अंबाती रायुडू, केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस आणि स्वतः कर्णधार धोनी यांचा समावेश आहे. हे खेळाडू फिरकीचा सामना करू शकतात.
सुरेश रैना यापुढे या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होणार नाही. पण त्यानंतरही चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी मजबूत दिसते. ज्यामुळे असे म्हणतात की चेन्नई चौथ्यांदा जेतेपद जिंकू शकेल.