इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारी (१९ सप्टेंबर) सुरुवात होत आहे. कोरोना संक्रमणामुळे आयपीएल २०२१ चा हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर आता या हंगामातील उर्वरित ३१ सामने दुसऱ्या टप्प्यात संयुक्त अरब अमिराती येथे होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणार आहे. तत्पूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला आहे.
मुंबई विरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नई संघाने आपापसातच सराव सामने (इंट्रास्क्वाड सामना) खेळले. यावेळी धोनी हवाई फटके मारताना दिसला. त्याच्या फलंदाजीचा व्हिडिओ चेन्नईने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की धोनी चेन्नईच्या गोलंदाजांविरुद्ध मोठमोठे फटके खेळत आहे. अनेक चेंडू तर सीमापार जात आहेत. या संपूर्ण व्हिडिओमध्ये धोनीच्या आक्रमक फलंदाजीचा अंदाज येतो. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.
All arealayum Thala…🥳#WhistlePodu #Yellove 🦁💛 @msdhoni pic.twitter.com/Zu85aNrRQj
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 18, 2021
धोनी जसा सराव सामन्यात खेळला, त्याचप्रमाणे तो आगामी हंगामातही खेळावा अशी चाहत्यांची इच्छा असेल. कारण गेल्या आयपीएल हंगामापासून धोनीची बॅट शांत राहिली आहे. धोनीने २०२० आयपीएल हंगामातही १४ सामन्यांत केवळ २०० धावा केल्या होत्या. तर त्याने आयपीएल २०२१ मध्ये आत्तापर्यंत ७ सामन्यांत केवळ ३७ धावा केल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्स संघ जबरदस्त फॉर्ममध्ये
कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे भारतात सुरु झालेल्या आयपीएल २०२१ च्या हंगामाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर आता उर्वरित सामने युएईमध्ये घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील कामगिरीनंतर गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स संघ ७ सामन्यांमधील ५ सामन्यांत विजय मिळवून १० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स या यादीत १२ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्स संघ पहिल्या टप्प्यातील उत्कृष्ट फॉर्मच दुसऱ्या टप्प्यातही कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
काही आले, तर काही गेले! आयपीएल २०२१ च्या युएई टप्प्यासाठी बदली खेळाडूंची संपूर्ण यादी
सर्वाधिक धावा, सर्वात लांब षटकार, सर्वाधिक विकेट्स, पाहा आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्याचा लेखाजोखा