शनिवारी (दि. १४ मे) चेन्नई सुपर किंग्स संघाचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायुडू याने ट्वीट करत एकच खळबळ माजवली. त्याने आपल्या ट्वीटमध्ये आयपीएलमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. यानंतर त्याने काही वेळातच आपले ट्वीट डिलीट केले. यामुळे क्रिकेट जगतात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर नेटकरी आणि दिग्गज खेळाडू त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ लागले. मात्र, अशातच आता चेन्नईचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी रायुडूच्या निवृत्तीवर स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले सीईओ?
“मी त्याच्याशी बोललोय. तो निवृत्त होत नाहीये. तो त्याच्या कामगिरीने निराश झाला होता आणि म्हणूनच त्याने ते ट्वीट केले असावे, पण त्याने ते डिलीट केले आहे. तो नक्कीच निवृत्त होणार नाही…,” असे कासी विश्वनाथन (Kasi Viswanathan) यांनी एका क्रीडा वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
गुजरात टायटन्सविरुद्ध चेन्नईच्या या हंगामातील अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी रायुडूने ट्विटरवर म्हणले होते की, “हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम असेल, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. आयपीएल खेळताना आणि १३ वर्षांपासून २ महान संघांचा भाग असताना मला खूप आनंद झाला. या अद्भुत प्रवासासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे मनापासून आभार मानायला आवडेल.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
चेन्नईचा महत्त्वाचा खेळाडू
रायुडूने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. रायुडू २०१८पासून चेन्नई संघाच्या फलंदाजी फळीतील महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. त्याने संघाला अनेक कठीण प्रसंगातून विजय मिळवून दिला आहे. रायुडूने आतापर्यंत चेन्नई संघाकडून ७३ आयपीएल सामने खेळले आहेत. यातील ६७ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने ३२.७९च्या सरासरीने १७७१ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतक आणि ८ अर्धशतकेही चोपली आहेत.
एकूण आयपीएल कारकीर्द
अंबाती रायुडूने आयपीएलमध्ये एकूण १८७ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २९.२८च्या सरासरीने ४१८७ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतक आणि २२ अर्धशतकेही झळकावली आहेत. विशेष म्हणजे, त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद १०० ही आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा