नवी दिल्ली। चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंद होईल. धोनी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू असेल. धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 193 सामने खेळले आहेत.
सीएकेचा स्टार फलंदाज सुरेश रैनानेसुद्धा 193 सामने खेळले आहेत. रैना आयपीएल 2020चा भाग नाही, अशा परिस्थितीत आजचा सामना खेळून धोनी सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर करेल.
2008 मध्ये होता सर्वात महागडा खेळाडू
विशेष म्हणजे सुरेश रैना आणि एमएस धोनी दोघेही पहिल्या हंगामापासून सीएसकेचा भाग आहेत. हे दोन्ही खेळाडू 2008 पासून सीएसकेकडून खेळत आहेत. आयपीएल 2008 च्या लिलावात धोनी हा सीएसकेचा सर्वात महागडा खेळाडू होता. त्याने प्रत्येक सामन्यात या संघाचे नेतृत्व केले आहे. सीएसकेने त्याच्या नेतृत्वात 163 पैकी 100 सामने जिंकले आहेत.
दोन वर्षे सीएसकेवर आली होती बंदी
एमएस धोनी हा 2016 आणि 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा भाग होता. स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे या दोन वर्षासाठी सीएसकेवर बंदी आली होती. धोनीने 2016 मध्ये पुणे संघाचे नेतृत्व केले होते. 2017 मध्ये कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथची निवड करण्यात आली होती.
सीएसकेला तीन वेळा बनवले चॅम्पियन
दोन वर्षांच्या बंदीनंतर धोनी सीएसके संघात परत आला आणि त्याने 2018 मध्ये आयपीएलचे तिसरे विजेतेपद जिंकले. सीएसकेने धोनीच्या नेतृत्वात शानदार कामगिरी केली आहे. 2008 पासून सुरू झालेल्या या लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जने आठ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. ही टीम दरवर्षी प्लेऑफमध्येही पोहोचली आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने 2010, 2011 आणि 2018 या वर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
200 सामने खेळणारा पहिला खेळाडू असेल
धोनी यंदा 200 आयपीएल सामन्यांमध्ये भाग घेणारा पहिला खेळाडू बनू शकतो. असे केल्यास त्याच्या नावावर पुन्हा एका विक्रमाची नोंद होईल.
आयपीएल 2020 मध्ये सीएसके संघ गुणतालिकेत आहे खालच्या स्थानी
माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने 193 आयपीएल सामन्यात 42.22 च्या सरासरीने 4476 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये 212 षटकारांसह सर्वाधिक षटकार मारण्याच्या तो पहिल्या पाच खेळाडूंमध्ये आहे. धोनीचा स्ट्राईक रेट 137.89 आहे आणि त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 23 अर्धशतके ठोकली आहेत. त्याने 39 यष्टीचित आणि 102 झेलदेखील घेतले आहेत. धोनीसाठी मात्र आयपीएल 2020 ची सुरुवात निराशाजनक होती. संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यापैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवला आहे. एका विजयासह सीएसके गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानी आहे.