चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल २०२२च्या ५५व्या सामन्यात रविवारी (दि. ०८ मे) दिल्ली कॅपिटल्सला ९१ धावांनी पराभवाचा धक्का दिला. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजाना दिल्लीच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. सध्या चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने मारलेल्या एका गगनचुंबी षटकाराची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच, या षटकाराचा व्हिडिओही तुफान व्हायरल होत आहे.
झाले असे की, दिल्ली कॅपटिल्स (Delhi Capitals) संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांच्या पहिल्या विकेटसाठीच्या ११० धावांच्या भागीदारीने शानदार सुरुवात करून दिली. यानंतर ऋतुराज बाद झाल्यानंतर शिवम दुबे (Shivam Dube) याने डाव सांभाळला. तसेच, वादळी खेळी करत त्याने २ चौकार आणि २ षटकारांचा पाऊस पाडला.
शिवम दुबेचा दबंग अंदाज
डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात चेन्नईने आपल्या प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सलामीवीरांच्या शतकी भागीदारीने संघाला चांगली सुरुवात मिळाली. यानंतर ऋतुराज बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेने आपल्या डावादरम्यान २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १९ चेंडूत ३२ धावा चोपल्या. त्याने मारलेल्या २ षटकारांमधील एक षटकार तब्बल ९६ मीटर लांबीचा होता. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
दुबेचा खडे-खडे ९६ मीटरचा गगनचुंबी षटकार
खरं तर, चेन्नईच्या डावातील १६वे षटक टाकण्यासाठी शार्दुल ठाकूर आला होता. यावेळी स्ट्राईकवर शिवम दुबे होता. यावेळी शार्दुलच्या तिसऱ्या चेंडूवर खडे-खडे ९६ मीटरचा गगनचुंबी षटकार मारला. शार्दुलच्या षटकात दुबेने २ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने १९ धावा केल्या. इतकेच नाही, तर या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दुबेचा झेल सुटला होता. त्यामुळे त्याला जीवदान मिळाल्याने दुबेने संघाच्या धावसंख्येत मोठे योगदान दिले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सामन्याचा आढावा
या सामन्यात चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ विकेट्स गमावत २०८ धावा चोपल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली संघाचा डाव ११७ धावांवरच संपुष्टात आला. या विजयामुळे चेन्नईला गुणतालिकेत मोठा फायदाही झाला. ते आठव्या स्थानी पोहोचले, तर दुसरीकडे दिल्ली संघ पाचव्या स्थानी आला. चेन्नई आठव्या स्थानी आल्यामुळे कोलकाताला १ जाग्याचे नुकसान झाले. ते गुणतालिकेत नवव्या स्थानी घसरले आहेत.