आयपीएलच्या मैदानात सोमवारी (दि. २५ एप्रिल) पंजाब किंग्जने ११ धावांच्या अंतराने चेन्नई सुपर किंग्जला धूळ चारली. हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. पंजाब किंग्जसाठी आयपीएल २०२२ मधील चौथा विजय, तर सीएसकेसाठी सहावा पराभव ठरला. पंजाबचा संघ गुणतालिकेत सध्या ८ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहेत, तर दुसरीकडे सीएसके मात्र ४ गुणांसह नवव्या क्रमांकावर कायम आहे.
चालू हंगामातील या दोन संघामध्ये झालेला हा दुसरा सामना होता. उभय संघातील पहिल्या सामन्यात देखील सीएसकेला पराभव मिळाला होता आणि आता दुसरा सामना देखील पंजाबनेच जिंकला आहे. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्सच्या नुकसानावर १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसके मात्र ६ विकेट्सच्या नुकसानावर १७६ धावांपर्यंत पोहोचू शकला. चला तर एक नजर टाकूया सीएसकेला मिळालेल्या पराभवामागच्या तीन प्रमुख कारणांवर.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कर्णधार रवींद्र जडेजाची सुमार खेळी
सीएसकेच्या ४ विकेट्स पडल्यानंतर कर्णधार रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी आला. जडेजा फलंदाजीसाठी आला, तेव्हा सीएसकेला वेगाने धावा करण्याची आवश्यकता होती. एका बाजूने अनुभवी फलंदाज अंबाती रायडू चांगले प्रदर्शन करत होता, पण दुसरीकडे जडेजाला मात्र झटपट खेळ करता येत नव्हता.
जडेजाने खूप चेंडू निर्धाव खेळले. एक वेळ अशी आली होती की, जडेजाने १४ चेंडूत अवघ्या १४ धावा केल्या होत्या. संघाला आवश्यक असलेल्या धावांच्या तुलनेत हे प्रदर्शन खूपच खराब होते. कर्णधाराचे हे सुमार प्रदर्शन सीएसकेला मिळालेल्या पराभवाचे महत्वाचे कारण ठरले.
नाही करता आली डावाची चांगली सुरुवात
उभय संघातील हा सामना वानखडे स्टेडियमवर खेळला गेला असल्यामुळे सीएसकेला मिळालेले १८८ धावांचे लक्ष्य जास्त काही अवघड नव्हते. या स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच फलंदाजीसाठी अनुकूल राहिली आहे. परंतु संघ डावाच्या सुरुवातीला चांगले प्रदर्शन करू शकला नसल्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला.