मुंबई| इंडियन प्रीमियर लीग २०२१ हंगामातील १२ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने ४५ धावांनी विजय मिळवला. चेन्नईचा हा या हंगामातील सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात चेन्नईने राजस्थानला १८९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला २० षटकात ९ बाद १४३ धावा करता आल्या.
राजस्थानला ३६ चेंडूत ९४ धावांची गरज असताना मोईन अलीने १५ व्या षटकात रियान पराग आणि ख्रिस मॉरीस यांना पहिल्या आणि तिसऱ्या चेंडूवर बाद करत राजस्थानला मोठे धक्के देत त्यांच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला. पराग आणि मॉरीस या दोघांचाही झेल रविंद्र जडेजाने घेतला.
यानंतर राहुल तेवतिया आणि जयदेव उनाडकटने थोडी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. तेवतिया १९ व्या षटकात ड्वेन ब्रावोच्या गोलंदाजीवर २० धावा करुन बाद झाला. तर शेवटच्या षटकात उनाडकटने २४ धावांवर शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. त्याचाही झेल जडेजाने घेतला. अखेर राजस्थानचा डाव २० षटकात १४३ धावाच करता आल्या.
चेन्नईकडून मोईन अलीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजा आणि सॅम करनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर शार्दुल ठाकूरने १ विकेट घेतली.
बटलरचे हुकले अर्धशतक, जडेजाच्या एकाच षटकात दोन विकेट्स
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी राजस्थानकडून जोस बटलर आणि मनन वोहरा सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. त्यांनी सुरुवातही चांगली केली. पण संघाच्या ३० धावा झाल्या असताना चौथ्या षटकात वोहरा रविंद्र जडेजाकडे झेल देत सॅम करनच्या गोलंदाजीवर १४ धावांवर असताना बाद झाला. त्याच्या पाठोपाठ ६ व्या षटकात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनही सॅम करनच्याच गोलंदाजीवर ड्वेन ब्रावोकडे झेल देत १ धावेवर बाद झाला.
यानंतर मात्र, बटलरने शिवम दुबेला साथीला घेत संघाचा डाव सावरला. पण या दोघांची जोडी चेन्नईसाठी डोकेदुखी ठरत असतानाच १२ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रविंद्र जडेजाने ४९ धावांवर खेळत असलेल्या बटलरला त्रिफळाचीत केले. त्यामुळे बटलरचे अर्धशतक केवळ १ धावेने हुकले. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शिवम दुबे पायचीत झाला. त्याने १७ धावा केल्या. त्यानंतर आक्रमक डेव्हिड मिलरला मोईन अलीने २ धावांवर १३ व्या षटकात पायचीत केले.
चेन्नईचे राजस्थानला १८९ धावांचे आव्हान
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्सला फलंदाजीसाठी अमंत्रित केले. त्यामुळे चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १८८ धावा केल्या आहेत आणि राजस्थानला १८९ धावांचे आव्हान दिले आहे.
चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस सलामीला फलंदाजीसाठी उतरले. या दोघांनी चांगली सुरुवात केली होती. पण यावेळीही ऋतुराजला मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो चौथ्या षटकात १० धावा करुन बाद झाला. त्यानंतर मोईन अली आणि डू प्लेसिसने चेन्नईचा डाव पुढे नेला. पण ६ व्या षटकात डू प्लेसिस ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर ३३ धावांवर रियान परागच्या करवी झेलबाद झाला.
त्यानंतर मोईन अलीला रैना चांगली साथ देत होता. अलीनेही मागील काही सामन्यांप्रमाणे या सामन्यात फटकेबाजी केली. मात्र, तो १० व्या षटकात २६ धावा करुन राहुल तेवातियाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर चेन्नईचे फलंदाज छोटेखानी खेळी करत नियमित कालांतराने बाद झाले.
अंबाती रायडू २७, सुरेश रैना १८, एमएस धोनी १८, रविंद्र जडेजा ८, सॅम करन १३ धावा करुन बाद झाले. करन आणि शार्दुल ठाकुर शेवटच्या षटकात बाद झाले. तर ड्वेन ब्रावो २० धावांवर नाबाद राहिला. अखेर ब्रावोने शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर १ षटकार मारत चेन्नईला १८८ धावांपर्यंत पोहचवले.
राजस्थानकडून चेतन सकारियाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच ख्रिस मॉरिसने २ विकेट्स घेतल्या. तर राहुल तेवातिया आणि मुस्कफिजून रेहमान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
राजस्थानने जिंकली नाणेफेक
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
या सामन्यासाठी ११ जणांचे संघ –
चेन्नई सुपर किंग्ज- ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सॅम करन, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर
राजस्थान रॉयल्स- मनन व्होरा, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार व यष्टीरक्षक), शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवाटिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, मुस्तफिझुर रहमान