आयपीएलचा सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन्सचा पराभव करत चांगली सुरुवात केली होती. मात्र काल(22 सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांचा 16 धावांनी पराभव झाला. या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. त्यांच्या फिरकीपटूंनीही उत्तम कामगिरी केली.
सामन्यातील पराभवाला फिरकीपटू जबाबदार
सामन्यानंतर चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनीने संघातील फिरकीपटूंना पराभवाला जबाबदार धरले आहे. चेन्नईकडून पियुष चावला, रविंद्र जडेजा या फिरकीपटूंनी ४ षटकात अनुक्रमे ५५ आणि ४० धावा दिल्या होत्या.
धोनीने केली संथ फलंदाजी
खरं तर जेव्हा संघाला धावांची आवश्यकता होती आणि महत्त्वपूर्ण वेळी वेगवान धावा करण्याची गरज होती तेव्हा धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने सॅम करन, केदार जाधव आणि ऋतुराज गायकवाड या फलंदाजांना आपल्यापुढे फलंदाजीसाठी पाठवले. एवढेच नव्हे, तर सीएसकेला जेव्हा प्रति षटकात सुमारे 17 धावांची गरज होती आणि अनुभवी फलंदाज फाफ डुप्लेसिस एका टोकाला वेगवान धावा करत होता तेव्हा धोनी खूपच संथ फलंदाजी करीत होता.
धोनी आणि फाफ यांनी सहाव्या गड्यासाठी 31 चेंडूंत 65 धावांची भागीदारी केली. यात डुप्लेसिसने 19 चेंडूत 55 धावा केल्या आणि धोनीने 12 चेंडूत केवळ 9 धावा केल्या.यावरून धोनी किती संथ खेळला याचा अंदाज येऊ शकतो. इतकेच नाही तर जेव्हा संघाला वेगवान धावा करण्याची आवश्यकता होती, तेव्हा धोनी फक्त एक धाव घेत होता, म्हणूनच तो आपला पहिला चौकार ठोकण्यासाठी 14 चेंडू खेळला. धोनीच्या संथगतीने धावा करण्यावर आणि खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येण्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
धोनीला सॅम करनला द्यायची होती संधी
धोनीने या संथ डावाबद्दल काहीही सांगितले नाही. मात्र सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याचे कारण धोनीने सांगितले. सामन्यानंतर तो म्हणाला, “14 दिवसांच्या क्वारंटाईनचा वाईट परिणाम झाला. मी बरेच दिवस फलंदाजी केली नव्हती. मला अष्टपैलू सॅम करनला संधी देऊन काही नवीन प्रयत्न करायचा होता. फाफ डुप्लेसीसने चांगली फलंदाजी केली.”