ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर झालेल्या रविंद्र जडेजाने आयपीएल २०२१ स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात चेन्नई संघाने ६९ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात जडेजाने अवघ्या २८ चेंडूत ६२ धावांची खेळी केली होती. यासोबतच ३ गडी देखील बाद केले होते. हा रोमांचक सामना संपल्यानंतर त्याने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीबद्दल मोठा खुलासा केला आहे.
जडेजाच्या विसाव्या षटकातील तुफान फटकेबाजीमुळे चेन्नई संघाला २० षटक अखेर ४ बाद १९१ धावा करण्यात यश आले होते. तर दुसऱ्या डावात देखील जडेजाने ३ महत्वाचे गडी बाद केले होते. त्यामुळे बेंगलोर संघाला ९ गडी गमावत अवघ्या १२२ धावा करण्यात यश आले होते.
हा सामना झाल्यानंतर त्याने खुलासा करत म्हटले की, “मी शेवटच्या षटकांमध्ये चेंडू हिट करण्याच्या प्रयत्नात होतो. माही भाईने (धोनीने) मला आधीच कल्पना दिली होती की, हर्षल पटेल ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करेल. त्यामुळे मी सतर्क होतो. मी चेंडू व्यवस्थित कनेक्ट करू शकलो आणि संघाच्या धावा १९१ पर्यंत पोहोचल्या. शेवटचे षटक आमच्यासाठी महत्वाचे होते. मला माहित होते की, जर मी स्ट्राइकवर असेल तर मी जास्तीत जास्त धावा करू शकतो.”
“मी आज खेळाचा आनंद घेतला. जेव्हा तुम्ही संघाच्या विजयात मोलाचं योगदान देता तेव्हा खूप चांगलं वाटतं. मी माझ्या फिटनेसवर आणि कौशल्यावर खूप भर देतो. माझे नशीब आहे की, मला मैदानावर चांगली कामगिरी करण्यास यश आले. मी सराव करत असताना कधीच गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या गोष्टींवर काम करत नाही. मी आधी माझ्या कौशल्यावर काम करतो मग नंतर फिटनेसवर. अशाप्रकारे मी माझे वर्कलोड व्यवस्थापित करतो,” असे जडेजा सामनावीर पुरस्कार स्विकारल्यानंतर म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
रविंद्र जडेजाची तुफान फटकेबाजी पाहून धोनीची पत्नी अवाक्; म्हणाली, ‘हा तर जंगली अवतार’
SRHचा पदार्पणवीर, ज्याच्या छोटेखानी खेळीमुळे पाहायला मिळाली हंगामातील पहिली सुपर ओव्हर






