यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफीच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमने सामने येणार आहेत. जो की हा सामना उद्या म्हणजे 09 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्री क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. तत्पूर्वी, न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी रविवारी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा गूढ फिरकीपटू वरुण चक्रवर्ती हा त्याच्या संघासाठी सर्वात मोठा धोका असेल, असे मत व्यक्त केले. त्यांच्या मते, चक्रवर्तीच्या प्रभावी कामगिरीचा सामना करण्यासाठी न्यूझीलंड संघाला अधिक सज्ज राहावे लागेल.
“आमच्याविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने 42 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तो खेळल्यास आमच्यासाठी मोठा धोका ठरू शकतो,” असे स्टीड यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, न्यूझीलंडला त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी रणनीती आखावी लागेल आणि धावा करण्यावर भर द्यावा लागेल. स्टीड यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या संघाने भारताविरुद्धच्या लीग सामन्यातून शिकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, भारतीय संघाला परिस्थितीची जाणीव असल्याने काहीसा फायदा होईल, पण त्यांच्या संघाने या मुद्द्यावर फारसे लक्ष केंद्रित केलेले नाही.
न्यूझीलंडने आपल्या शेवटच्या ग्रुप अ सामन्यासाठी दुबईला प्रवास केला आणि नंतर उपांत्य फेरीसाठी पाकिस्तानला गेले. यामुळे संघाच्या प्रवासात व्यत्यय निर्माण झाला, पण खेळाडूंनी परिस्थितीशी जुळवून घेतले आहे.
“लाहोरमधून येथे येताना प्रवास खूप झाला, त्यामुळे थोडे थकलेले आहोत. पण आता अंतिम सामन्यासाठी तयारी करण्यास वेळ मिळेल,” स्टीड म्हणाले. त्यांनी असेही सांगितले की, या टप्प्यावर संघाला जास्त सराव करण्याची गरज नाही, तर मानसिक आणि शारीरिक तयारीवर भर द्यावा लागेल.
“फायनलमध्ये पोहोचणे अत्यंत रोमांचक आहे. सुरुवातीला आठ संघ होते, आता फक्त दोनच उरले आहेत. आम्ही या क्षणाचा आनंद घेत आहोत आणि भारताविरुद्ध चांगली कामगिरी करायला उत्सुक आहोत,” असे स्टीड यांनी सांगितले.
हेही वाचा-
रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, साधणार धोनीच्या या विक्रमाशी बरोबरी!
Women’s Day: ऑलिंपिकमध्ये भारतीय महिलांची दैदिप्यमान कामगिरी, पाहा जिद्द, मेहनत आणि विजयाची कहाणी!
काय सांगता! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तान कनेक्शन? पाहा धडकी भरवणारा योगायोग






