---Advertisement---

टी२० विश्वचषकात आयर्लंडच्या क्रिकेटपटूने घडवला इतिहास! ४ चेंडूत घेतल्या सलग ४ विकेट्स

---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सोमवारी (१८ ऑक्टोबर) पहिल्या फेरीतील गट अचे सामने खेळवले गेले. सोमवारी पहिला सामना आयर्लंड विरुद्ध नेदरलँड्स संघांमध्ये अबुधाबी येथे पार पडला. या सामन्यात आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने ४ चेंडूत सलग ४ विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली आहे. याबरोबरच त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांची सुरुवात खराब झाली. सलामीवीर बेन कुपने पहिल्याच षटकात विकेट गमावली. त्यानंतर ५ व्या षटकात बास द लीडनेही ७ धावांवर विकेट गमावली. पण, नेदरलँड्सला मोठा धक्का बसला तो १० व्या षटकात. आयर्लंडकडून कर्टिस कॅम्फरने टारलेल्या या षटकात त्याने सलग ४ विकेट्स घेतल्या.

त्याने या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ऍकरमनला नील रॉककरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ तिसऱ्या चेंडूवर टेन डॉशेट, तर चौथ्या चेंडूवर स्कॉट एडवर्ड्स पायचीत झाले. त्यामुळे कॅम्फरने या टी२० विश्वचषकातील पहिली हॅट्रिक पूर्ण केली. पण तो यावरच थांबला नाही. त्याने या षटकाच्या ५ व्या चेंडूवर व्हॅन डर मर्व्हला त्रिफळातीत करत इतिहास रचला.

कॅम्परने घातली विक्रमांना गवसणी
कॅम्फर हा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा एकूण १४ वा खेळाडू ठरला आहे. तर आयर्लंडचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

इतकेच नाही तर, पुरुषांच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत हॅट्रिक घेणारा तो केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीने केला आहे. ब्रेट लीने २००७ सालच्या टी२० विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. पण, असे असले तरी कॅम्पर हा असा पहिलाच गोलंदाज ठरला, ज्याने टी२० विश्वचषकात ४ चेंडूत ४ विकेट्स घेतल्या.

त्याचबरोबरच कॅम्पर हा पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ४ चेंडूत सलग ४ विकेट्स घेणारा तिसराच गोलंदाज आहे. यापूर्वी अशी कामगिरी लसिथ मलिंगा आणि राशिद खानने केली आहे. मलिंगाने न्यूझीलंडविरुद्ध २०१९ मध्ये ४ चेंडूत ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर, राशिदने २०१९ मध्येच आयर्लंड विरुद्ध ४ चेंडूत ४ विकेट्स घेतल्या होत्या.

आयर्लंडचा विजय
या सामन्यात आयर्लंड संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला. नेदरलँड्सला प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सर्वबाद १०६ धावाच करता आल्या होत्या. नेदरलँड्सकडून मॅक्स ओडोडने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. आयर्लंडकडून कॅम्फरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर, मार्द एदेरने ३ विकेट्स आणि जोशुओ लिटिलने १ विकेट घेतली.

त्यानंतर १०७ धावांचा पाठलाग आयर्लंडने १५.१ षटकात ३ विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. त्यांच्याकडून गॅरेथ डेलानीने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर, पॉल स्टर्लिंगने नाबाद ३० धावांची खेळी केली. नेदरलँड्सकडून तीन गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: पराभवानंतर बांगलादेशचा कर्णधार प्रेस कॉन्फरन्समध्ये आला, पण स्कॉटीश फॅन्सने घातला ‘असा’ गोंधळ

हार्दिकच्या मुलाखतीदरम्यान ‘पापा’ म्हणत छोट्या अगस्त्यने घेतली सरप्राईज एन्ट्री, पाहा बाप-लेकाचा गोड व्हिडिओ

‘टी२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहचणार नाही पाकिस्तान संघ’, माजी क्रिकेटरचा घरचा आहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---