भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) न्यूझीलंडला 70 धावांनी पराभवाचा धक्का दिला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवताच स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे तिकीटही मिळवले. मात्र, या सामन्यादरम्यान भारताचा सलामीवीर शुबमन गिल रिटायर्ड हर्ट होऊन मैदानातून बाहेर गेला होता. अशात आता सामन्यानंतर त्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सांगितले आहे की, मुंबईत खूपच उकाडा होता आणि त्याच्या मांसपेशी ताणल्या गेल्या होत्या. गिलनुसार, त्याला झालेल्या डेंग्यूचा प्रभाव होता.
शुबमनची खेळी
शुबमन गिल (Shubman Gill) याच्या न्यूझीलंडविरुद्धच्या खेळीविषयी बोलायचं झालं, तर त्याने ताबडतोब फलंदाजी केली. भारतीय क्रिकेट संघाचा ‘प्रिन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुबमनने 66 चेंडूत नाबाद 80 धावांचे योगदान दिले. त्याच्या खेळीत 3 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. मात्र, यापूर्वी 23व्या षटकादरम्यान शुबमन गिल रिटायर्ड हर्ट (Shubman Gill Retired Hurt) झाला होता.
काय म्हणाला शुबमन?
सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना शुबमनला यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर गिलने म्हटले की, “मला आधी क्रँप आले आणि त्यानंतर मांसपेशी ताणल्या गेल्या. उकाडा खूपच वाढत होता आणि जो डेंग्यू झाला होता, त्याचा परिणाम पाहायला मिळत होता. डेंग्यूमुळे थोडाफार प्रभाव पडला आहे. जर क्रँप्स आले नसते, तर कदाचित मी शतक मारले असते. मात्र, आम्ही मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचलो आणि कोण शतक करते आणि कोण नाही, यामुळे फरक पडत नाही.”
भारतीय संघ अंतिम सामन्यात
भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला 70 धावांनी धोबीपछाड देत विश्वचषक 2023 अंतिम सामना (World Cup 2023 Final) गाठला. भारताकडून शुबमनव्यतिरिक्त विराट कोहली (117) आणि श्रेयस अय्यर (105) यांनी जबरदस्त फलंदाजी करत शतक झळकावले. तसेच, गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी चमकला. त्याने न्यूझीलंडविरुद्ध 9.5 षटकात 57 धावा खर्चत सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या.
आता भारतीय संघ 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळेल. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (South Africa vs Australia) संघात दुसरा उपांत्य सामना खेळला जात आहे. या सामन्यात जो संघ बाजी मारेल, तो भारताविरुद्ध अंतिम सामन्यात दोन हात करेल. (cwc 23 1st semi final cricketer shubman gill reacts on suffering from cramps in semi final match)
हेही वाचा-
INDvsNZ Semi Final: श्रेयसच्या शतकानंतर रोहितने खास अंदाजात केली नक्कल, व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू
IND vs NZ Semi Final: जेव्हा सर्वांसाठी व्हिलन बनला होता शमी, बुमराहनेही लपवलेलं तोंड- Video