भारतीय महिला संघाने बुधवारी (०३ ऑगस्ट) बार्बाडोसवर १०० धावांनी विजय मिळवत कॉमनवेल्थ गेम्स २०२२ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यासह कॉमनवेल्थ गेम्समधील उपांत्य फेरीत प्रवेश करणारे अंतिम ४ संघ मिळाले आहेत. आता या संघांमध्ये येत्या ३ दिवसांत उपांत्य फेरी सामने खेळले जातील. २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल खेळात क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे या ४ क्रिकेट संघांची नजर सुवर्णपदक जिंकत इतिहास रचण्यावर असेल.
बुधवारी ऑस्ट्रेलियाने (Australia) पाकिस्तानला ४४ धावांनी पराभूत करत उपांत्य फेरीचे (Semi Final) तिकीट मिळवले होते. साखळी फेरीतील सलग तिन्ही सामने जिंकत सर्वाधिक ६ गुणांसह ऑस्ट्रेलिया संघ गट अ मधून उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ बनला. त्यानंतर याच दिवशी रात्री झालेल्या सामन्यात भारतीय संघाने (Team India) बार्बाडोसवर उल्लेखनीय विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर भारताने १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत बार्बाडोसच्या संघाला ६२ धावांवरच रोखले. अशाप्रकारे भारतीय संघाने १०० धावांनी हा सामना जिंकला. साखळी फेरीतील ३ पैकी २ सामने जिंकत भारतीय संघ गट अ मधून उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ बनला आहे. दुसरीकडे गट ब मधून यजमान इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे.
आता शनिवारी (०६ ऑगस्ट) बर्मिंघमच्या ऍजबस्टन स्टेडियमवर या ४ संघांत २ उपांत्य सामने खेळले जातील. पहिला उपांत्य सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होईल. त्यानंतर त्याचदिवशी रात्री १०.३० वाजता दुसरा उपांत्य सामना रंगेल. तत्पूर्वी गुरुवारी (०४ ऑगस्ट) राहिलेले अखेरचे २ साखळी फेरी सामने होतील. या सामन्यांच्या निकालावरून उपांत्य फेरीत कोणता संघ कोणाचा सामना करेल, हे स्पष्ट होईल.
शनिवारी उपांत्य फेरी सामन्यात विजय मिळवणारे २ संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करतील. तर पराभूत होणारा संघ तिसऱ्या जागेसाठीचा प्लेऑफ सामना खेळेल. हे सामने रविवारी (०७ ऑगस्ट) होतील. तिसऱ्या जागेसाठीचा प्लेऑफ सामना दुपारी २.३० वाजता सुरू होईल. हा सामना जिंकणारा संघ कांस्य पदक पटकावेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला रिकामे हात परत जावे लागेल. त्यानंतर रात्री ९.३० वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होईल. हा सामना जिंकणारा संघ सुवर्ण पदकावर नाव कोरेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला रौप्य पदक मिळेल.
कॉमनवेल्थ गेम्स २०२२ च्या उपांत्य फेरी सामन्यांचे वेळापत्रक
६ ऑगस्ट
पहिला उपांत्य सामना- दुपारी ३.३० वाजता
दुसरा उपांत्य सामना- रात्री १०.३० वाजता
७ ऑगस्ट
कांस्य पदकासाठी लढत- दुपारी २.३० वाजता
सुवर्ण पदकासाठी लढत- रात्री ९.३० वाजता
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा






