---Advertisement---

CWG 2026: भालाफेकीत भारताची दुहेरी कमाई; नीरजला रौप्य, यश वीरला कांस्य

On: शनिवार, ऑगस्ट 1, 2026 6:41 AM
---Advertisement---

यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा (Commonwealth Games) नववा दिवस भारतासाठी अत्यंत शानदार ठरला. पुरुषांच्या भालाफेक (javelin throw) प्रकारात भारताने दमदार कामगिरी करत दोन पदके जिंकली. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 85.83 मीटर अंतरासह रौप्य पदक पटकावले, तर यश वीर सिंगने 85.41 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कांस्य पदक जिंकले. या स्पर्धेतील सुवर्ण पदक श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पाथिरागे याने जिंकले; त्याने 89.75 मीटर अंतराची नोंद केली.

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक अंतिम फेरीत एकूण 13 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश होता.

नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात 80.97 मीटर अंतरावर भाला फेकला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 85.83 मीटर अंतराची नोंद केली, जी त्याची या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आणि काही काळासाठी तो अव्वल स्थानावर पोहोचला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने 81.29 मीटर आणि चौथ्या प्रयत्नात 80.73 मीटर अंतराची नोंद केली. मात्र, श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पाथिरागेची आघाडी त्याला मोडता आली नाही.

पाचव्या आणि सहाव्या प्रयत्नात, भाला फेकल्यानंतर नीरजने मुद्दाम ‘फाऊल’ केला आणि अखेरीस रौप्य पदक निश्चित केले.

या स्पर्धेत नीरज चोप्रासोबत यश वीर सिंग आणि रोहित यादव हे देखील भारताचे प्रतिनिधित्व करत होते. रोहित यादवने 81.56 मीटर अंतरासह सातवे स्थान मिळवले.

मात्र, यश वीर सिंगने आपल्या अंतिम म्हणजेच सहाव्या प्रयत्नात शानदार कामगिरी करत संपूर्ण चित्रच पालटून टाकले. पाचव्या फेरीनंतर तो सहाव्या स्थानावर होता. परंतु, अंतिम प्रयत्नात 85.41 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह त्याने थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. परिणामी, कांस्य पदक जिंकले. ही कामगिरी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---