प्रो कबड्डी 2022 च्या चौथ्या दिवशी दुसरा सामना दबंग दिल्ली विरुद्ध गुजरात जायंट्स असा खेळला गेला. नवीन कुमारच्या नेतृत्वातील दिल्लीने गुजरातला अक्षरशः पछाडत 53-33 ने स्पर्धेतील आपला सलग दुसरा विजय संपादन केला. कर्णधार नवीनने (15 गुण) पुन्हा एकदा देखणी कामगिरी करत संघाला विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
गतविजेता दिल्ली आणि यावेळी नव्या रूपात खेळत असलेल्या गुजरात यांच्या दरम्यानच्या या सामन्याची सुरुवात वेगवान झाली. पहिल्या 10 मिनिटात दोन्ही संघ 9-9 बरोबरीत होते. दिल्लीचा डिफेन्स शानदार कामगिरी करत असताना गुजरातसाठी राकेश एकाकी झुंज देत होता. मात्र, पहिले सत्र संपण्यासाठी दीड मिनिट शिल्लक असताना दिल्लीने गुजरातला ऑल आउट केले. पहिल्या सत्राच्या अखेरीस दिल्लीकडे 21-17 अशी चार गुणांची आघाडी होती.
पहिल्या सत्रात काहीसा हळू खेळलेल्या दिल्लीच्या नवीन कुमारने दुसऱ्या सत्रात वेग पकडला. सुरुवातीला दोन गुण त्याने आपल्या नावे करत सुपर टेन पूर्ण केला. दुसऱ्या सत्रातील दहाव्या मिनिटाला त्याने चक्क पाच गुणांची रेड मारत गुजरातला दुसऱ्यांदा ऑल आउट केले. त्यानंतर हे त्यांनी आपले आक्रमण सुरूच ठेवत गुजरातला डोके वर काढू दिले नाहीत. गुजरातसाठी महिंद्र राजपूतने थोडाफार संघर्ष केला. मात्र, पहिल्या सत्रात चमकलेल्या राकेशला अपयश आले. अखेरचा मिनिट शिल्लक असताना दिल्लीने पुन्हा एकदा गुजरातला ऑल आउट करत पन्नास गुणांपर्यंत मजल मारली. अखेर दिल्लीने 53-33 असा विजय मिळवत स्पर्धेत अजिंक्य राहण्याची कामगिरी केली.
तत्पूर्वी, दिवसातील पहिला सामना यु मुंबा विरुद्ध यूपी योद्धाच असा झाला. या सामन्यात मुंबईच्या डिफेंडर्सने अक्षरशा यूपीच्या रेडर्सना अक्षरशः धूळ चारली. मुंबईने 30-23 असा सामना आपल्या नावे केला. यावर्षीच्या हंगामातील हा मुंबईचा पहिला विजय ठरला.