दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डेल स्टेनचा असा विश्वास आहे की २०२२ च्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाजाच्या स्थानासाठी दिनेश कार्तिक रिषभ पंतच्या पुढे आहे. स्टेनच्या मते, कार्तिक ताकदीने पुढे जात असताना पंतने आपल्या चुकांमधून धडा घेतला नाही.
आयपीएल २०२२मध्ये चांगली कामगिरी करून भारतीय टी२० मध्ये पुनरागमन करणाऱ्या कार्तिकने राजकोट येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी२० सामन्यात २७ चेंडूत ५५ धावांची स्फोटक खेळी खेळली आणि आपल्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीमुळे भारताने १६९ धावा केल्या आणि ८२ धावांनी सामना जिंकला. कार्तिकला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
दुसरीकडे, रिषभ पंत आतापर्यंत छोट्या फॉरमॅटमध्ये भारतासाठी प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. चौथ्या टी२०मध्ये संघाला अडचणीत आणणारा तो खराब शॉट खेळून बाद झाला. त्याने २३ चेंडूत १७ धावा केल्या. त्यामुळे कार्तिक विरुद्ध पंत यावर बोलताना स्टेन म्हणाला की, “भारताने टी-२० विश्वचषकासाठी फॉर्मात असलेला खेळाडू निवडला पाहिजे.”
पुढे बोलताना स्टेन म्हणाला की, “पंतला या मालिकेत चार संधी मिळाल्या पण तो त्याच चुका करत असल्याचे दिसते. तुम्हाला असे वाटेल की चांगले खेळाडू त्यांच्या चुकांमधून शिकतात. त्याने तसे केले नाही आणि प्रत्येक वेळी जेव्हा तो आला तेव्हा डीकेने त्याचा वर्ग दाखवला. तुम्हाला विश्वचषक जिंकायचा असेल, तर तुम्ही फॉर्मात असलेला माणूस निवडा. जर तो जबरदस्त फॉर्ममध्ये असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीची निवड करा. त्याचा जबरदस्त फॉर्म कायम राहिल्यास डीकेचे नाव प्रथम समाविष्ट केले जाईल ”
शिवाय दिनेश कार्तिकच्या टी२० विश्वचषकात सामील होण्याच्या शक्यतेबद्दल स्टेन म्हणाला की, “असे लोक आहेत ज्यांना संघ प्रतिष्ठेच्या आधारावर निवडतील. पण, कार्तिक इतका जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, जर त्याने तोच फॉर्म कायम ठेवला तर तो या वर्षाच्या अखेरीस विश्वचषक दौर्यासाठी भारतीय संघात त्या फ्लाइटवर लिहिल्या गेलेल्या पहिल्या नावांपैकी एक असेल.”
दरम्यान, २०२२च्या वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जे खेळाडू संघात सामील होतील त्यांना संभाव्यत: इंग्लंड विरुद्धच्या टी२० सामन्यांच्या मालिकेपासून आजमावण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पंतने खेळलेल्या ‘त्या’ चालीचे नेहराजींनी केले कौतुक, म्हणाले ‘या गोष्टी महत्त्वाच्या असतात’
दोन भारतीय दिग्गजांमध्ये वाद अन् कारण ठरतोय दिनेश कार्तिक, वाचा काय आहे प्रकरण