भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलच्या या हंगामानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे आ( कर्णधारपद सोडण्याची घोषणा केल्यानंतर, अनेक दिग्गज वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. परंतु, विराटचा जवळचा मित्र राहिलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेनने या निर्णयामागील कारण सांगितले आहे.
हे आहे कारण
कोहलीने कर्णधारपद सोडण्यामागचे मुख्य कारण सांगताना स्टेन म्हणाला,” या निर्णामागील मुख्य कारण त्याचे कुटुंब आहे. खरे तर हा पैलू आयुष्यात येणे निर्विवाद आहे. कोहलीच्या आजूबाजूला त्याची पत्नी अनुष्का शर्मा आहे आणि एक नवजात मुलगी देखील आहे, आणि जेव्हा परिस्थिती अशी असते, तेव्हा करिअर आणि जीवनाबद्दल एक नवीन दृष्टीकोन नक्कीच येत असतो.”
स्टेनने पुढे सांगितले की, “कोहली आरसीबीशी सुरुवातीपासून जोडला गेला आहे. जसजसे आयुष्य पुढे जाते, तसतसे तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम ठरवू लागता. विराटचे कुटुंब यावेळी खूप लहान आहे आणि कर्णधारपद त्याच्या मनावर ओझे टाकू शकते आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरही भार टाकू शकते. कारकिर्दीच्या या टप्प्यावर कर्णधारपद सोडण्याच्या त्याच्या निर्णयामुळे त्याच्या फलंदाजीला फायदा होऊ शकतो.”
आरसीबीसाठी बरीच वर्षे खेळलेल्या या माजी वेगवान गोलंदाजाने सांगितले की, “कोहलीच्या नेतृत्वाबद्दल कोणालाही शंका नाही. तो एक हुशार खेळाडू आहे आणि त्याच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. विराटची कामगिरी त्याच्याबद्दल सर्व काही सांगण्यासाठी पुरेशी आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येक गोष्ट त्याच्यावर अवलंबून आहे. त्याला भविष्यात त्याची कारकीर्द कशी घडवायची आहे ते माहित असून कदाचित हा एक चांगला निर्णय असेल कारण विश्वचषक देखील जवळ येत आहे.”
स्टेनने याकडेही लक्ष वेधले की, आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी न केल्यामुळे त्याच्यावर टीकाही होत होती. त्यामुळे त्याने कर्णधारपद सोडल्याच्या निर्णय घेतलेला असू शकतो.