भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj ) याने यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याचे कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला जेव्हा-जेव्हा कसोटी संघासोबत खेळण्याची संधी मिळाली, त्याने अप्रतिम प्रदर्शन केले. दुखापतीमुळे तो न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने अपेक्षित कामगिरी केली. त्याचे या सामन्यातील प्रदर्शन पाहून न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी ( Daniel Vettori ) ने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सिराजने दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करून जबरदस्त प्रदर्शन केले. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने न्यूझीलंडच्या वरच्या फळीतील तीन फलंदाजांना स्वस्तात बाद केले. त्यानंतर न्यूझीलंड संघाला गळती लागली आणि संघ अवघ्या ६२ धावांवर सर्वबाद झाला. त्याच्या या प्रदर्शनासाठी अनेकांनी त्याचे कौतुक केले.
न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलत होता. यावेळी त्याने सिराजचे कौतुक केले. तो म्हणाला, “सिराज खास आहे. प्रत्येक वेळी तो जेव्हा कसोटी सामन्यात येतो, तेव्हा काही ना काही होते. कोहली थोडी उर्जा आणण्यासाठी त्याच्याकडे जातो आणि त्याची गती तिच राहते. तो जोरात धावतो आणि एका वेगवान गोलंदाजाच्या रूपात, ते सर्वकाही करतो, जे तुम्हाला हवे आहे.”
भारताच्या आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्याविषयी बोलताना त्याने ईशांत शर्माच्या आधी सिराजला संधी मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. याविषयी तो म्हणाला की, “हे ईशांतला कमी लेखण्याविषयी नाहीये. पण मला वाटते की, सिराजसारख्या एखाद्या व्यक्तीने दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीमध्ये भारतीय गोलंदाजी आक्रमणाला काहीतरी देण्याची ही योग्य वेळ आहे.”
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ३७२ धावांनी विजय मिळवला आणि मालिका १-० अशा फरकाने जिंकली. या मालिकेनंतर आता भारतीय स़घ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण अफ्रिकेतील परिस्थिती वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असते. अशात मोहम्मद सिराज या दौऱ्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. ( India Tour Of South Africa)
महत्त्वाच्या बातम्या-
एका दिग्गजाची दुसऱ्या दिग्गजाला दाद! आर अश्विनकडून एजाज पटेलला खास भेट, व्हिडिओ व्हायरल
संघ वेगळे, पण नावांनी जोडले! मुंबई कसोटीनंतर वानखेडे स्टेडियमवर दिसले अनोखे दृश्य
क्षेत्ररक्षण करताना एजाजचा स्टँडमध्ये बसलेल्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद, व्हिडिओ व्हायरल