श्रीलंका संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सलग दुसऱ्यांदा एन्ट्री केली आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीतील पाचव्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघ आमने- सामने होते. या सामन्याचा निकाल अखेरच्या चेंडूवर लागला. श्रीलंका संघाने पाकिस्तानचा 2 विकेट्सने पराभव केला. या विजयामुळे श्रीलंका आता अंतिम सामन्यात भारताशी दोन हात करणार आहे. या विजयानंतर श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका हा भलताच खुश झाला. त्याने संघाच्या खेळाडूंवर स्तुतीसुमने उधळली. चला तर, तो काय म्हणाला, जाणून घेऊयात…
काय म्हणाला शनाका?
पाकिस्तान पराभवाचा धक्का दिल्यानंतर दसून शनाका (Dasun Shanaka) भलताच खुश झाला. त्याने यावेळी फलंदाजी आणि गोलंदाजीत खेळाडूंनी केलेल्या प्रदर्शनाचे कौतुक केले. तो म्हणाला, “खेळ आमच्या नियंत्रणाखाली होता, पण विकेट्स गमावल्यामुळे हा सामना अखेरच्या षटकापर्यंत लांबला गेला. आम्ही त्यांना सामन्यात परतण्याची संधी दिली, पण आम्हाला माहिती होते की, चरिथ आम्हाला सामना जिंकून देऊ शकतो.”
“आम्ही फलंदाजीसाठी उतरण्यापूर्वी चर्चा केली होती. आम्ही भारताविरुद्धच्या सामन्यात ज्या चुका केल्या होत्या, त्याविषयी चर्चा केली. आम्ही पहिल्या 10 षटकात विकेट्स गमावल्या आणि कुसल मेंडिस आणि सदीरा समरविक्रमा शानदार खेळले. मला वाटते की, ते श्रीलंका संघातील फिरकीचे सर्वोत्तम खेळाडू आहेत.”
“आणि चरिथ असलंका, त्याने शानदार खेळ दाखवला. खास भावना. लागोपाठ अंतिम सामन्यात एन्ट्री. मी पाठिंबा देणाऱ्या आणि अंतिम सामन्याची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानायला हवे,” असेही पुढे बोलताना शनाका म्हणाला.
सामन्याचा आढावा
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांना महागात पडला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 42 षटकांचा करण्यात आला. यावेळी पाकिस्तानने 7 विकेट्स गमावत 252 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान याने सर्वाधिक नाबाद 86 धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त अब्दुल्ला शफीक (52) आणि इफ्तिखार अहमद (47) यांनीही मोलाचे योगदान दिले. यावेळी श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना मथीशा पथिराना याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने 42 षटकात 8 विकेट्स गमावत 252 धावा केल्या. यावेळी डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेने 2 विकेट्सने हा सामना नावावर केला. यावेळी श्रीलंकेकडून कुसल मेंडिस याने सर्वाधिक 91 धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त सदीरा समरविक्रमा (48) आणि चरिथ असलंका (49) यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना इफ्तिखार अहमद याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. (dasun shanaka on sri lanka victory against pakistan in asia cup 2023 super- 4)
हेही वाचा-
Finalचं तिकीट हुकताच खचून गेला बाबर, आपल्याच खेळाडूंवर काढला सगळा राग; म्हणाला, ‘म्हणून आम्ही हारलो…’
अखेरच्या चेंडूवर पाकिस्तान चीत! थरारक विजयासह श्रीलंका फायनलमध्ये