इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही बलाढ्य संघामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने ३६४ धावांचा डोंगर उभारला होता. या धावा करण्यात केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी मोलाचे योगदान दिले. या डावात रिषभ पंत मोठी खेळी खेळण्यास अपयशी ठरला असला तरी देखील त्याला इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचे मन जिंकण्यात यश आले आहे.
भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याने गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. यष्टिरक्षण असो किंवा फलंदाजी दोन्ही क्षेत्रात तो अप्रतिम कामगिरी करत आहे. अनेकांनी त्याची तुलना दिग्गज क्रिकेटपटूंसोबत केली आहे. काही लोकांनी असेही म्हटले होते की, भविष्यात एमएस धोनी सारखी कामगिरी करेल. अशातच इंग्लड संघाचे माजी क्रिकेटपटू डेविड लॉयड यांनी रिषभच्या फलंदाजीची तुलना ॲडम गिलख्रिस्टसोबत केली आहे.
डेविड लॉयड यांनी डेलीमेलमध्ये लिहिले की, “रिषभ पंत जेव्हा फलंदाजी करण्यासाठी आला होता, त्यावेळी इंग्लंड संघाने भारतीय संघातील दोन फलंदाजांना माघारी धाडले होते. दिनेश कार्तिकने मला विचारले की, एक माजी मुख्य प्रशिक्षकाच्या नात्याने तुम्ही रिषभला सावध होऊन खेळण्याचा सल्ला द्याल का? मी म्हटले नाही, परिस्थिती कशी ही असो, आक्रमक फलंदाजी करणे त्याची भूमिका आहे. त्याची फलंदाजी मला ॲडम गिलख्रिस्टची आठवण करून देते. त्याची कुठलीही कमजोर बाजू नाही.”
रिषभ पंतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून अवघे काही वर्षच झाले आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ अडचणीत असताना फलंदाजीला येऊन सामना जिंकवून दिला होता. तसेच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने ८८ चेंडूंमध्ये ४१ धावांची खेळी केली होती. परंतु, मोठा फटका खेळायच्या नादात तो बाद झाला होता. ज्यामुळे अनेकांनी त्याच्या आक्रमक फलंदाजी शैलीवर टीका देखील केली होती. परंतु डेविड लॉयड यांचे म्हणणे आहे की, त्याची आक्रमक फलंदाजी शैली चांगली आहे आणि तो हीच आक्रमक फलंदाजी शैली पुढे घेऊन जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटसाठी काही पण! दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर राहिलेला अय्यर ‘या’ कारणामुळे एकटाच पोहोचला युएईत