भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या मोठा अडचणीत सापडणार असल्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमच्या मैदानावर झाला. या सामन्यात भारताने ३१७ धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराटने पंच नितिन मेनन यांच्याशी वाद घातला. त्यामुळे शिक्षा म्हणून त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात येण्याची चिन्हे आहेत. अशात इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेविड लॉयड यांनी याच मुद्द्यावरुन विराटवर निशाणा साधला आहे.
लॉयड यांनी डेली मेल वृत्तपत्रातील आपल्या कॉलममध्ये लिहिले की, ‘दुसऱ्या कसोटी सामन्यातील पंचांसोबतच्या दुर्व्यहारासाठी विराटला लाल कार्ड द्यायला पाहिजे होते. परंतु त्याच्याविरोधात कोणत्याही कारवाई संदर्भात कसलीही चर्चा होत नाहीये. यामुळे मी अचंबित झालो आहे. सोबतच मला या गोष्टीचे वाईटही वाटत आहे. एका राष्ट्रीय संघाच्या कर्णधाराला चालू सामन्यात एका अधिकाऱ्यावर टिका करणे, त्यांना मोठ्या आवाजात बोलणे, त्यांचा विरोध करणे याची परवानगी नाही.’
‘असे असतानाही त्याला मैदानाबाहेर न करता दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळवण्यात आले. जर इतर कोणता खेळ असता, तर त्या व्यक्तिला तेव्हाच मैदानाबाहेर करण्यात आले असते. विराटने निश्चितपणे येत्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू नये,’ असे त्यांनी पुढे लिहिले.
तसेच शेवटी लिहताना त्यांनी म्हटले की, ‘सामान्य जनतेला क्रिकेटपटूंच्या कोणत्याही चुकीचे गांभीर्य समजून देण्यासाठी पिवळे आणि लाल कार्ड देण्याची प्रथा सुरू करायला हवी. विराटला तर सरळ लाल कार्ड मिळायला हवे. याचा अर्थ असा होईल की, तो पुढील तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर होईल. सामना रेफरी जवागल श्रीनाथ यांनी या मुद्द्यावर कसलेही भाष्य केलेले नाही. ते आपल्या खोलीत मजेत आराम करत आहेत. या प्रकरणाला साडे तीन दिवस लोटले, तरी त्यांच्या तोंडून शब्द निघाला नाही.’
नक्की काय आहे प्रकरण?
त्याचे झाले असे की, इंग्लंडचा संघ चौथ्या डावात फलंदाजी करायला उतरला असताना तिसऱ्या दिवसाचे शेवटचे षटक अक्षर पटेल टाकत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जो रूटविरुद्ध पायचीतचे अपील झाले. मात्र पंच नितीन मेनन यांनी रूट नाबाद असल्याचा निर्णय दिला. परंतु भारतीय खेळाडूंनी या निर्णयाविरोधात डीआरएसची मदत घेऊन तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली.
तिसऱ्या पंचांनी रिप्ले पहिला असता, रूटच्या बॅटला चेंडू लागला नव्हता. तसेच बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू स्टंपला लागतं असल्याचेही स्पष्ट होते. मात्र चेंडू लागण्याचा इम्पॅक्टमध्ये अम्पायर्स कॉल असे दाखवले. त्यामुळे मैदानावरच्या पंचांनी रुटला आधीच नाबाद दिल्याने तो नाबाद राहिला.
मात्र डीआरएसच्या या निर्णयावर कोहली नाखुश असल्याचे दिसून आले. त्याने या निर्णयाबद्दल आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. तसेच या निर्णयाबाबत तो काही काळ पंचांशी हुज्जत घालत असल्याचेही दिसून आले. मात्र कोहलीच्या या कृतीमुळे सामनाधिकार्यांकडून त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भूरर..! आयपीएल लिलावाचा थरार चालू असताना टीम इंडिया सोडणार चेन्नई, होणार अहमदाबादला रवाना
श्रेयस अय्यरचा संघ लिलावात देणार सगळ्यांना टक्कर, आखून ठेवलीय ‘खास’ रणनिती






