---Advertisement---

टीम इंडियापुढे वॉर्नरसह ‘या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे आव्हान; सिडनी कसोटीत खेळण्याची शक्यता

On: मंगळवार, जानेवारी 5, 2021 6:52 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी क्रिकेड ग्राउंडवर होणारा तिसरा कसोटी सामना अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सामन्याद्वारे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर याचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. सोबतच दुखापतीतून सावरलेला ऑस्ट्रेलियन फलंदाज विल पुकोवस्की या सामन्यातून कसोटीत पदार्पण करण्याचीही संभावना आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. संघ निवडकर्त्यांसह झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते.

लँगर म्हणाले की, “मला आशा आहे की वॉर्नर तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी सज्ज आहे. तो क्रिकेट खेळण्यासाठी काहीही करू शकतो. आता तो पूर्णपणे दुखापतीतून सावरला असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला पुकोवस्कीदेखील फिट असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सराव सत्रात तो चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात तो अवश्य खेळेल.”

वॉर्नर पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकला

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज वॉर्नरला या हंगामात आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याला भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे तो उरलेला तिसरा वनडे सामना खेळू शकला नाही. त्यानंतर ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतही त्याला सहभागी होता आल नाही. याबरोबरच दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांनाही तो मुकला आहे. अशात सिडनीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून त्याने पुनरागमन केले; तर तो सलामीला फलंदाजीसाठी उतरेल.

सराव सामन्यात पुकोवस्कीला झाली होती दुखापत

पहिल्या कसोटी सामन्याची सुरुवात होण्यापुर्वी ‘भारत अ’ आणि ‘ऑस्ट्रेलिया अ’ या दोन संघात तीन दिवसीय सराव सामना झाला होता. या सामन्यादरम्यान भारतीय गोलंदाज कार्तिक त्यागीचा बाउंसर पुकोवस्कीच्या डोक्यावर लागला होता. त्यामुळे ऍडलेड झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले. जर येत्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली तर तो वॉर्नरसोबत सलामीला फलंदाजी करताना दिसेल.

कसोटी मालिका १-१ ने बरोबरीवर

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ८ विकेट्सने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ८ विकेट्सने ऑस्ट्रेलियाला नमवत मागील पराभवाचा वचपा काढला होता. अशाप्रकारे दोन्ही संघांनी मालिकेत १-१ ची बरोबरी साधली आहे. ७ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान सिडनी येथे तिसरा कसोटी सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवत मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ झगडताना दिसतील.

महत्त्वाच्या बातम्या-

“तिसऱ्या सामन्यात रोहित द्विशतक ठोकेल”, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर, उद्या मिळू शकतो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय फलंदाजीची कमान सांभाळली ‘या’ खेळाडूंनी; काढल्या खोऱ्याने धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---