ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या बिग बॅश लीग (BBL 2024-25) मध्ये दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरसोबत एक विचित्र घटना घडली. प्रथम शॉट मारताना वॉर्नरची बॅट तुटली आणि नंतर तीच बॅट त्याच्या डोक्याला लागली. ऑस्ट्रेलियाचा हा माजी फलंदाज बीबीएलमध्ये सिडनी थंडरचं नेतृत्व करत आहे. स्पर्धेत होबार्ट हरिकेन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सिडनी थंडरच्या कर्णधाराच्या बॅटचे दोन तुकडे झाले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
स्पर्धेतील 29वा सामना होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी थंडर यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात सिडनी थंडरचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं शानदार फलंदाजी केली. त्यानं 66 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीनं 88 धावा केल्या. यादरम्यान त्याची बॅट तुटली. बिग बॅश लीगच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वॉर्नरच्या बॅट तुटण्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की शॉट खेळत असताना चेंडू वॉर्नरच्या बॅटवर आदळताच त्याची बॅट तुटते आणि तुटलेली बॅट त्याच्या डोक्यावर आदळते. हे पाहून कमेंटेटरही हसायला लागतात. तुटलेली बॅट पाहून वॉर्नर मनोरंजक प्रतिक्रिया देतो. तुम्ही या घटनेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
David Warner’s bat broke and he’s hit himself in the head with it 🤣#BBL14 pic.twitter.com/6g4lp47CSu
— KFC Big Bash League (@BBL) January 10, 2025
या सामन्यात होबार्ट हरिकेन्सनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सिडनी थंडरनं 20 षटकांत 6 बाद 164 धावा केल्या. यादरम्यान कर्णधार वॉर्नरनं संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानं 88 धावा केल्या. वॉर्नर वगळता संघातील बाकी सर्व फलंदाज अपयशी ठरले.
सॅम बिलिंग्ज संघाकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. बिलिंग्जनं 15 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीनं फक्त 28 धावा केल्या. संघातील एकूण पाच फलंदाजांना दुहेरी अंकही गाठता आला नाही. होबार्ट हरिकेन्सकडून रिले मेरेडिथनं सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा –
शुबमन गिलकडे वनडेत मोठा विक्रम रचण्याची संधी, ही कामगिरी करणारा बनेल पहिलाच खेळाडू
श्रीलंका दौऱ्यावर कर्णधारपद मिळाल्यानंतर स्टीव्ह स्मिथची प्रतिक्रिया, म्हणाला..
ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करणारा भारतीय गोलंदाज निवृत्त, कसोटी-वनडेत केला होता कहर!