---Advertisement---

वॉर्नरची बॅट तळपली! ३१ चेंडूत अर्धशतक करत विराट-रोहितच्या पंक्तीत मिळवले स्थान

On: शुक्रवार, ऑक्टोबर 29, 2021 1:57 AM
---Advertisement---

दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धात गुरुवारी(२८ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघात सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ७ विकेट्सने मोठा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्याच्या या विजयात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली, याबरोबरच खास विक्रमही आपल्या नावावर केला.

बुधवारी आपल्या ३५ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या वॉर्नरने गुरुवारी श्रीलंकेच्या गोलंदाजांना ३१ चेंडूत अर्धशतक करत आपल्या बॅटचा तडाखा दिला. या सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १५५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉर्नरने ४२ चेंडूत १० चौकारांसह ६५ धावांची खेळी केली.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची ही वॉर्नरची विसावी वेळ होती. त्यामुळे तो सर्वाधिकवेळा पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत त्याने आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगची बरोबरी केली आहे. स्टर्लिंगनेही २० वेळा ५० धावांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे या यादीत स्टर्लिंग आणि वॉर्नर संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर आहेत.

या यादीत पहिल्या दोन क्रमांकांवर भारताचे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे फलंदाज आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये विराटने २९ वेळा, तर रोहितने २६ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने हा कारनामा २२ वेळा केला आहे. या ५ पुरुष फलंदाजांनाच आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये आत्तापर्यंत २० किंवा त्यापेक्षा अधिकवेळा ५० धावांचा टप्पा पार करता आला आहे.

वॉर्नरच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाचा सहज विजय
गुरुवारी वॉर्नरने अर्धशतकी खेळी करण्याबरोबरच ऍरॉन फिंचसह सलामीला ७० धावांची भागीदारी केली. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मजबुत पाया रचला गेला. फिंचने ३७ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल मात्र ५ धावांवर बाद झाला. पण अखेर स्टिव्ह स्मिथ (२८) आणि मार्कस स्टॉयनिस (१६) यांनी नाबाद राहात ऑस्ट्रेलियाला १७ षटकांत १५५ धावसंख्या गाठून दिली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने २ विकेट्स आणि दसून शनकाने १ विकेट घेतली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेकडून कुशल परेरा आणि चरिथ असलंका यांनी प्रत्येकी ३५ धावांची खेळी केली. तसेच भानुका राजपक्षने ३३ धावांचे योगदान दिले. त्यामुळे श्रीलंकेला २० षटकात ६ बाद १५४ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क, ऍडम झम्पा आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. झम्पाने १२ धावा देत २ विकेट्स घेतल्याने त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या – 

धक्कादायक! पाकिस्तान संघातील तीन खेळाडू करोना पॉझिटिव्ह; १० दिवस राहावे लागणार क्वारंटाईनमध्ये

‘शॉट विराटभाई!’, नेटमधील ‘किंग’ कोहलीचा सराव पाहून इशान किशन, श्रेयस अय्यर स्तब्ध; पाहा व्हिडिओ

आयपीएलदरम्यान धोनीने कोणता सल्ला दिला होता? मार्कस स्टॉयनिसने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---