आयपीएल २०२१ मधील ३३ वा सामना दुबई येथे गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबाद व दुसऱ्या क्रमांकावरील दिल्ली कॅपिटल्स या संघात खेळला गेला. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्याचा इराद्याने मैदानात उतरलेल्या हैदराबाद संघाला प्रथम फलंदाजी करताना पहिल्याच षटकात जबर धक्का बसला. संघाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा खातेही न खोलता तंबूत परतला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना हैदराबादसाठी डेव्हिड वॉर्नर व वृद्धिमान साहा यांनी डावाची सुरुवात केली. दिल्लीसाठी पहिले षटक वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए हा टाकत होता. पहिले दोन चेंडू निर्धाव टाकल्यानंतर तिसरा काहीसा वेगवान चेंडू वॉर्नर लेग साईडला मारण्याच्या प्रयत्नात असताना, चेंडू बॅटची कड घेऊन हवेत उडाला. तो एकही धाव न काढता अक्षर पटेलच्या हाती झेल देऊन बाद झाला.
इतक्या वर्षांनी शून्यावर बाद झाला वॉर्नर
आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धातील पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झालेला वॉर्नर तब्बल पाच वर्षांनी आयपीएलमध्ये शून्यावर बाद झाला. यापूर्वी अखेरच्या वेळी तो २०१६ आयपीएल वेळी खाते खोलू शकला नव्हता. वॉर्नर आपल्या आयपीएल कारकिर्दीत आत्तापर्यंत केवळ ८ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वप्रथम २००९ मध्ये शून्यावर बाद झालेला. त्यानंतर, २०१० आयपीएलमध्ये तो दोन वेळा खाते खोलू शकला नाही. तसेच, २०१३ मध्ये दोन वेळा तर २०१४ मध्ये एकदा तो शून्यावर बाद झालेला. यादरम्यान त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व केले होते.
या वर्षी आयपीएलमध्ये नाही फॉर्मात
आयपीएल २०२१ च्या सुरुवातीला हैदराबाद संघाचा कर्णधार असलेला वॉर्नर सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. या हंगामात त्याने आत्तापर्यंत ८ सामने खेळताना केवळ दोन अर्धशतके झळकावली आहेत. तसेच, त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेत केन विलियम्सनकडे देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
केकेआरविरुद्ध खेळणार का रोहित आणि हार्दिक? बोल्टने दिली महत्त्वपूर्ण माहिती
‘मँचेस्टर कसोटीप्रमाणे आयपीएलही रद्द होते का ते पाहू’, मायकेल वॉनची कोपरखळी