२०२३ च्या विश्वचषकाला अजून ३ वर्षे बाकी आहेत. हा विश्वचषक भारतात होणार आहे. या विश्वचषकात खेळण्याची इच्छा भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर यांनी व्यक्त केली आहे.
नुकताच रोहितने भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाबरोबर इंस्टाग्राम लाईव्हमध्ये बोलताना विश्वचषकात खेळण्याच्य इच्छेबद्दल सांगितले. तर cricket.com.au. च्या वृत्तानुसार वॉर्नरनेही २०२३ चा विश्वचषक अंतिम ध्येय असल्याचे सांगितले आहे.
रोहितने म्हटले आहे की ‘मला वाटते आपल्याला चांगली संधी आहेत कारण ३ विश्वचषक आहे. २ टी२० विश्वचषक आणि एक ५० षटकांचा विश्वचषक. आणि मी याआधीही खूप वेळा म्हटलो आहे की कमीतकमी आपण २ विश्वचषक जिंकायला हवा.’
तसेच वॉर्नर म्हणाला, ‘वेळेनुसार कळेल. सध्यातरी मी फिट आहे आणि मी धावा घेण्यासाठी चांगला धावतही आहे. जर पुढेही मी चांगले खेळत राहिलो तर विश्वचषक अंतिम ध्येय आहे.’
या दोघांनीही म्हटल्याप्रमाणे त्यांच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेतला तर ते नक्कीच २०२३ चा विश्वचषक खेळू शकतात. त्यांच्या कामगिरीचा घेतलेला हा तुलनात्मक आढावा –
सलामीवीर म्हणून कामगिरी –
रोहितने सलामीला १४० वनडे सामने खेळले असून यात त्याने ५८.११ च्या सरारीने ७१४८ धावा केल्या आहेत. तसेच वॉर्नरने १२२ वनडे सामन्यात सलामीला ४५.६१ च्या सरासरीने ५२४६ धावा केल्या आहेत.
याबरोबर २०१७ पासून रोहितने ७१ वनडेत सलामीला तब्बल ६५.३१ च्या सरासरीने ३९८४ धावा केल्या आहेत. तर वॉर्नरने मार्च २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान आलेली १ वर्षांची बंदी वगळता एकूण ३५ सामने खेळले असून ५२.७५ च्या सरासरीने १६८८ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा हा फॉर्म जर असाच कायम राहिला तर ते दोघेही आपापल्या संघासाठी २०२३ विश्वचषकासाठी महत्त्वाचे आणि अनुभवी खेळाडू ठरतील.
२०१९ च्या विश्वचषकातील कामगिरी –
रोहित आणि वॉर्नरसाठी २०१९ चा विश्वचषक शानदार ठरला होता. विशेष म्हणजे हे दोघेही २०१९ च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे पहिल्या २ क्रमांकावर होते आणि दोघांमध्ये केवळ १ धावेचे अंतर होते. रोहितने ९ सामन्यात ८१ च्या सरासरीने ६४८ धावा केल्या होत्या. यात त्याने ५ शतके करण्याचा कारनामा केला होता. तर वॉर्नरने ७१.८८ च्या सरासरीने ३ शतके आणि ३ अर्धशतकांसह ६४७ धावा केल्या होत्या.
वयाचा फायदा –
सध्या वॉर्नर आणि रोहित हे दोघेही सध्या ३३ वर्षांचे आहेत. ते २०२३ च्या विश्वचषकापर्यंत ३६-३७ वर्षांचे असतील. त्यामुळे त्यांच्या वयाचा विचार करता ते हा विश्वचषक नक्कीच खेळू शकतात. मात्र हा विश्वचषक त्यांच्या कारकिर्दीतील कदाचित शेवटचा विश्वचषक असेल.
याआधी वॉर्नर २०१५ च्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. त्यामुळे त्याचे एकदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुर्ण झाले आहे. मात्र २०१५ आणि २०१९ च्या दोन्ही विश्वचषकात भारताला उपांत्य सामन्यात पराभव स्विकारावा लागल्याने रोहितचे अजून वनडे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
हसीन जहाॅं प्रकरण भोवणार, शमीला मिळणार नाही अर्जुन पुरस्कार?
या दोन क्रिकेटपटूंना मिळू शकतो अर्जुन पुरस्कार, बीसीसीआयकडून नावाची शिफारस?
गरीबीमुळे एकवेळ फक्त मॅगी हेच अन्न होते, आज आहे मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू