युएईत सुरू असलेल्या टी२० विश्वचषक २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची सुरुवात अतिशय धमाकेदार राहिली आहे. पहिले दोन्ही सामने जिंकत हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) दुबईत श्रीलंकाविरुद्ध झालेल्या सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवत त्यांनी या स्थानावर उडी घेतली आहे. त्यांच्या या विजयात सलामीवीर डेविड वॉर्नर याता मोठा वाटा राहिला. त्याने या सामन्यात ताबडतोब अर्धशतकी खेळी केली. या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेतील आपल्या एका कृतीने त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सामन्यानंतर आपण संघाच्या विजयात दिलेल्या अर्धशतकी योगदानामुळे वॉर्नरला पत्रकार परिषदेत आमंत्रित करण्यात आले. यावेळी त्याने पत्रकार परिषदेत गेल्यानंतर टेबलवर ठेवलेली कोका कोलाची बाटली उचलून पुन्हा खाली ठेवली. यानंतर त्वरित व्यवस्थापनातील एका सदस्याला तिथे धाव घ्यावी लागली.
पत्रकार परिषदेत प्रश्न-उत्तरांचा सेशन सुरू होण्यापूर्वी वॉर्नरने हे कृत्य केले होते. त्याने टेबलवर ठेवलेल्या कोका कोलाच्या २ बाटल्या घेतल्या आणि टेबलखाली ठेवल्या. त्यानंतर लगेचच आयसीसीच्या व्यवस्थापनातील एक सदस्य पळत त्याच्याकडे आला आणि त्याने वॉर्नरला त्या बाटल्या पुन्हा टेबलवर ठेवण्याची विनंती केली. वॉर्नरनेही त्यांचे म्हणणे ऐकत पुन्हा त्या बाटल्या टेबलवर ठेवल्या. यानंतर वॉर्नर असेही म्हणाला की, “ख्रिस्तियानो रोनाल्डोने असे केलेले योग्य होते, मग मीही तीच कृती केल्यास माझ्यासाठीही ती योग्य आहे.” वॉर्नरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
https://twitter.com/imDL45/status/1453919181808680963?s=20
David Warner removed Coke bottles before starting the Press Conference, but was asked to put it back.
On this he said, "if it’s good enough for Cristiano, it’s good enough for me". pic.twitter.com/5WtkOy4oM4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 28, 2021
पण त्याच्या या कृतीमुळे पुन्हा एकदा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चर्चांना उधाण आले आहे. कारण रोनाल्डोनेच टेबलवर ठेवलेल्या सॉफ्ट ड्रिंकच्या बाटलीसंबंधीचा विवाद निर्माण केला होता. त्याने एका पत्रकार परिषदेत टेबलवर ठेवलेल्या कोका कोलाच्या बाटली उचलून त्याजागी पाण्याची बाटली ठेवली होती. याद्वारे त्याने सॉफ्ट ड्रिंक आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा संदेश चाहत्यांना दिला होता. परंतु यामुळे कोका कोला कंपनीला कोट्यावधींचे नुकसान झाल्याने हे प्रकरण खूप गाजले होते.
दरम्यान वॉर्नरने श्रीलंकेविरुद्ध फॉर्ममध्ये परतत टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. त्याने या सामन्यात ४२ चेंडूंमध्ये १० चौकारांच्या मदतीने ६५ धावा फटकावल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
वॉर्नर सोडणार सनरायझर्स हैदराबादची साथ, आता नव्या संघांच्या नेतृत्तवपदासाठी ठोकणार दावेदारी
सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर पहिल्यांदाच शमीने शेअर केली पोस्ट, वाचा काय लिहिलंय त्यात?
वेस्ट इंडिज आणि बांगलादेशमध्ये ‘करा वा मरा’ची लढत, पराभूत होणाऱ्या संघाचा संपणार प्रवास!





