ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यानं क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतात स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मला भारतात काही वेळ घालवायला आवडेल, असे तो म्हणाला.
डेव्हिड वॉर्नर गेल्या अनेक वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये खेळतो आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा परदेशी क्रिकेटपटू आहे. तो नेहमीच भारत आणि इथल्या लोकांबद्दलच्या प्रेमाबद्दल उघडपणे बोलत असतो.
डेव्हिड वॉर्नर आयपीएल खेळण्यासाठी जवळपास तीन महिने भारतात असतो. तो 7 वर्ष सनरायझर्स हैदराबादसोबत राहिला. याशिवाय, तो पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा एक भाग होता आणि आता तो पुन्हा या संघासोबत आहे. वॉर्नर अनेकदा सोशल मीडियावर भारतीय चित्रपटांबद्दल बोलतो आणि स्वत: रील्स आणि शॉर्ट्स देखील शेअर करतो. आता तर भारतीय चित्रपट निर्मात्यांनीही वॉर्नरचा जाहिरातींमध्ये वापर करण्यास सुरुवात केली आहे.
क्रिकेटपटू आर अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना डेव्हिड वॉर्नर म्हणाला, “भारतात माझं घर नाही. मी इथे घर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. बरेच लोक मला विचारतात की, मला इथे घर हवं आहे का? एक दिवस निश्चितच. कदाचित जेव्हा मी माझं क्रिकेट करिअर पूर्ण करेल, त्यानंतर मला इथे काही वेळ घालवायचा आहे. इथलं जीवन चांगलं आहे. मी माझ्या मुलींसोबत मॉलमध्ये जातो आणि सर्व काही आत्मसात करून घेतो. ”
डेव्हिड वॉर्नर पुढे बोलताना म्हणाला, “इथे आल्यावर सर्व काही सकारात्मक वाटतं. इथल्या लोकांना जीवन आवडतं.” भारतीय चाहत्यांबाबत बोलताना तो म्हणाला, “मी सुरक्षेशिवाय बाहेर पडल्यावर लोकं मला वेडा समजतात. मात्र लोकांना मला भेटून फोटो काढायचे असतात. तसेच त्यांना हेही समजतं की, जेव्हा मी माझ्या मुलींसोबत बाहेर जातो, तेव्हा अंतर राखलं पाहिजे.”
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळतील की नाही? जाणून घ्या BCCI आणि ECB मध्ये काय चर्चा झाली
ड्रेसिंग रुममध्ये इतका निराश का दिसत होता रोहित? व्हायरल VIDEO पाहून चाहतेही भावूक
आयपीएलमध्ये फाटलेल्या स्नायूंनी खेळतोय महेंद्रसिंह धोनी! डॉक्टरांनी दिल्या विश्रांतीच्या सक्त सूचना