ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नरला आगामी आयपीएल हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले. दिल्ली संघाने वॉर्नरला संघात घेण्यासाठी मेगा लिलावात ६.२५ कोटी रुपये खर्च केले. परंतु आयपीएल २०२२ मधील पहिल्या ४ किंवा ५ सामन्यांमध्ये तो शक्यतो उपस्थित राहू शकणार नाही. वॉर्नर सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि त्यांनंतर तो ऑस्ट्रेलियामध्ये परतून महान लेग स्पिनर शेन वॉर्नला श्रद्धांजली अर्पण करणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या सर्व खेळाडूंना आयपीएलमध्ये ५ एप्रिलपूर्वी सहभाग घेण्यास मनाई केली आहे. तसेच ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न यांच्या निधनामुळेही डेविड वॉर्नर (David Warner) आयपीएलच्या (IPL 2022) पहिल्या काही सामन्यांमध्ये उपस्थित राहू शकणार नाही. वॉर्नरने सांगितल्याप्रमाणे, तो शेन वॉर्नच्या श्रद्धांजली सभेसाठी नक्की उपस्थित राहणार आहे. दरम्यान, मागच्या आठवड्यात थालंडमध्ये ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर वॉर्नचे निधन झाले. ३० मार्चला त्याला श्रद्धांजली दिली जाणार आहे.
शेन वॉर्न श्रद्धांजली देण्यासाठी १०० टक्के उपस्थित राहणार वॉर्नर
डेविड वॉर्नर म्हणाला की, “आयपीएल असो किंवा नसो, पण मी वॉर्नच्या श्रद्धांजली सभेसाठी १०० टक्के जाणार आहे. जेव्हा मी लहान होतो, तेव्हा माझ्या भिंतीवर वॉर्नचा पोस्टर लावलेला होता. मला नेहमीच शेन वॉर्नसारखे बनायचे होते.” दरम्यान, पाकिस्ताविरुद्धचा शेवटच कसोटी सामना लाहोरमध्ये खेळला जाणार आहे, जो २१ मार्चला सुरू होऊन २५ मार्चपर्यंत संपेल. त्यानंतर वॉर्नर मेलबर्नला रवाना होईल.
तसे पाहिले तर, ५ एप्रिलपूर्वी वॉर्नर आयपीएलमध्ये सहभाग घेऊ शकणार नव्हताच. कारण, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ५ एप्रिलनंतर त्यांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभाग घेण्याची परवानगी दिली आहे. याच कारणास्तव शेन वॉर्नला श्रद्धांजली दिल्यानंतर ६ एप्रिलला वॉर्नर मुंबईसाठी रवाना होईल. बीसीसीआयच्या नियमांप्रमाणे स्पर्धेत सहभाग घेण्यापूर्वी त्याला ५ दिवसांच्या विलगीकरणात राहावे लागेल. त्यानंतर दोन वेळा आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव आल्यानंतरच तो दिल्ली कॅपिटल्सच्या बायो बबलमध्ये सहभागी होऊ शकेल.
महत्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! बेंगलोर कसोटीत १००% चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी
रावळपिंडी कसोटीतील खेळपट्टीमूळे पुन्हा पाकिस्तानची नाचक्की; आयसीसीनेही केली कारवाई