ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. डेव्हिड वॉर्नरनं क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु काही दिवसांपूर्वी त्यानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळण्याचे संकेत दिले होते. तेव्हापासून वॉर्नर निवृत्तीतून परतणार का आणि पुन्हा खेळणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. आता याबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहं.
डेव्हिड वॉर्नरनं 2024 टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्यानं या वर्षाच्या सुरुवातीलाच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तर टी20 विश्वचषकानंतर त्याच्या टी20 कारकिर्दीचा शेवट झाला. मात्र, निवृत्तीनंतर डेव्हिड वॉर्नरनं गरज पडल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकतो, असे म्हटलं होतं.
वॉर्नर म्हणाला होता, “मी काही काळ फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहीन. तसेच निवड झाल्यास मी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यासही तयार आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल खेळाडू आणि कर्मचाऱ्यांचं आभार. या संघाला गेल्या काही वर्षांत अतुलनीय यश मिळालं आहे आणि ते असंच दीर्घकाळ चालू राहो.”
आता याबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय निवडकर्ते जॉर्ज बेली यांनी, डेव्हिड वॉर्नरचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश होणार नसल्याची पुष्टी केली आहे. याचाच अर्थ आता वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार नाही.
डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये दीर्घकाळ क्रिकेट खेळला आहे. त्यानं सलामी करताना ऑस्ट्रेलियाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेत बॉल टेम्परिंगमध्ये नाव समोर आल्यानंतर त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी तो संघाचा उपकर्णधार होता. तसेच त्याच्यावर आजीवन कर्णधारपदाचीही बंदी घालण्यात आली होती. मात्र, या सर्व परिस्थितीतून बाहेर पडून डेव्हिड वॉर्नरनं दमदार पुनरागमन केलं. ऑस्ट्रेलियाला 2021 टी20 विश्वचषक आणि 2023 एकदिवसीय विश्वचषक जिंकवून देण्यात त्याचं महत्त्वाचं योगदान होतं.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या ‘या’ खेळाडूला कांगारुंनी दिलं संघात स्थान
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी! “भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी आला नाही तर…”
मेस्सी दुखापतग्रस्त…तरीही हार मानली नाही! अर्जेंटिनानं सलग दुसऱ्यांदा जिंकला कोपा अमेरिकाचा खिताब