चेन्नई। रविवारी (२५ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ मध्ये डबल हेडर सामने झाले. या दिवसातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ६९ धावांनी पराभवाचा धक्का दिला. तर दुसरा सामनाही रोमांचक झाला. दुसर्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले. त्यामुळे दिल्लीच्या नावावर एक खास तर हैदराबादच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. त्यानुसार दिल्लीने २० षटकात ४ बाद १५९ धावा करत हैदराबादला १६० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना २० षटकाच हैदराबादलाही ७ बाद १५९ धावाच करता आल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवली गेली.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादकडून केन विलियम्सन आणि डेव्हिड वॉर्नरने अक्षर पटेलविरुद्ध ७ धावा केल्या. त्यामुळे विजयासाठी सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी ८ धावांचे लक्ष्य दिल्ली समोर होते. दिल्लीकडून हे आव्हान रिषभ पंत आणि शिखर धवनने सहज पार केले. त्यामुळे हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला
विशेष म्हणजे गेल्या तीन्ही हंगामात दिल्ली आणि हैदराबाद संघांनी किमान एकतरी सुपर ओव्हर खेळली आहे. पण गेल्या तीन्ही हंगामात दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात विजय मिळवला आहे. तर हैदराबादने पराभव स्विकारला आहे. त्यामुळे सलग तीन हंगामात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवणारा दिल्ली हा पहिला संघ ठरला आहे. तर हैदराबाद पहिला असा संघ ठरला आहे जो सलग तीन हंगामात सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाला आहे.
साल २०१९ च्या हंगामात दिल्लीने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर २०२० हंगामात दिल्लीने पंजाब किंग्सविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर २०२१ हंगामात त्यांनी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवला.
तसेच सनरायझर्स हैदराबादबद्दल सांगायचे झाल्यान त्यांनी २०१९ सालच्या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव स्विकारला होता. तर २०२० हंगामात त्यांना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता दिल्लीविरुद्ध २०२१ हंगामात सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात रविवारी झालेली सुपर ओव्हर ही आयपीएल इतिहासातील एकूण १४ वी सुपर ओव्हर ठरली. तर २०२१ हंगामातील पहिलीच सुपर ओव्हर ठरली.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटसाठी दुष्काळात तेरावा महिना! पराभवानंतर झाली ‘ही’ कारवाई
‘अशी’ ऐतिहासिक कामगिरी करणारा जड्डू पहिला खेळाडू नाही, सीएसकेच्याच सहकाऱ्याने रचला होता इतिहास
पंतचा मोठा विक्रम! श्रेयस अय्यरला तर मागे टाकलेच पण यष्टीरक्षक म्हणून धोनी, गिलख्रिस्टलाही ठरला भारी