दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे रिषभ पंतला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं. याशिवाय त्याला 30 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. याचाच अर्थ आता रिषभ पंत रविवारी (12 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही.
रिषभ पंतचा चालू आयपीएलमधील आचारसंहितेअंतर्गत हा तिसरा गुन्हा होता, ज्यामुळे त्याला 30 लाख रुपये दंड आणि एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा इम्पॅक्ट प्लेअरसह प्लेइंग इलेव्हनच्या उर्वरित खेळाडूंना वैयक्तिक 12 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 50 टक्के, यापैकी जे कमी असेल, तेवढा दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएल आचारसंहितेच्या कलम 8 नुसार, दिल्ली कॅपिटल्सनं मॅच रेफरीच्या निर्णयाला आव्हान देणारं अपील दाखल केलं होतं. यानंतर, अपील पुनरावलोकनासाठी बीसीसीआय लोकपालकडे पाठवण्यात आलं. लोकपालने याची व्हर्च्युअल सुनावणी घेतली आणि मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील याची पुष्टी केली.
आयपीएलच्या स्लो ओव्हर रेटशी संबंधित आचारसंहितेनुसार, जर एखाद्या संघाच्या कर्णधारानं आयपीएलच्या हंगामात पहिला गुन्हा केला तर त्याला 12 लाख रुपयांचा दंड आकारला जातो. जर त्या कर्णधारानं दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटचा गुन्हा केला तर त्याला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो. तिसऱ्यांदा चूक झाल्यास कर्णधारावर एका सामन्याची बंदी आणि 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो.
गुणतालिकेत सध्या पाचव्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्ससाठी हा मोठा धक्का आहे. रिषभ पंत या हंगामात जबरस्त फार्मात असून, त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांमध्ये 41.30 ची सरासरी आणि 156.43 च्या स्ट्राईक रेटनं 413 धावा ठोकल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘थाला’ला भेटायला चाहता सरळ मैदानात! ‘माही’च्या पाया पडला अन्….हा व्हायरल व्हिडिओ नक्की पाहाच
चेन्नईला पराभवाचे पाणी पाजत गुजरात टायटन्स संघाने प्लेऑफच्या आशा ठेवल्या जिवंत ! IPL 2024