दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात सोमवारी (४ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात ५० वा सामना झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ३ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत पहिल्या २ संघातील स्थान पक्के केले आहे. तसेच यंदाच्या हंगामात साखळी फेरीत चेन्नईला २ वेळा पराभूत करणारा दिल्ली एकमेव संघ आहे.
या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १३६ धावा केल्या आणि दिल्लीला १३७ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग दिल्लीने १९.४ षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केला.
दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी सलामीला फलंदाजी केली. पण शॉ फार काही करु शकला नाही. त्याला तिसऱ्या षटकात दीपक चाहरने १८ धावांवर बाद केले. त्यानंतर श्रेयस अय्यरने शिखरची साथ देण्याचा प्रयत्न केला. पण तो ६ व्या षटकात २ धावा करुन जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचा ऋतुराज गायकवाडने झेल घेतला. यानंतर रिषभ पंतही लवकर माघारी परतला. त्याला ९ व्या षटकात रविंद्र जडेजाने बाद केले. त्याचा अप्रतिम झेल मोईन अलीने घेतला.
पदार्पणवीर रिपल पटेलने शिखरची साथ दिली. पण, तोही फार काळ टिकला नाही. त्याला १८ धावांवर जडेजाने १३ व्या षटकात बाद केले. नंतर आर अश्विनला १५ व्या षटकात शार्दुल ठाकूरने त्रिफळाचीत करत सामन्यात रोमांच आणला. अश्विनने २ धावा केल्या. याच षटकात शार्दुलने शिखरलाही ३९ धावांवर बाद केले.
त्यानंतर शिमरॉन हेटमायरने अक्षर पटेलला साथीला घेत संघाला विजयाच्या दिशेने नेले होते. दरम्यान, हेटमायरचा झेल १८ व्या षटकात १२ धावांवर असताना राखीव क्षेत्ररक्षक कृष्णप्पा गॉथमकडून सुटला, ज्याचा मोठा फटका चेन्नईला बसला. त्यानंतरच्या षटकात १० धावा दिल्लीने वसूल केल्या.
अखेरच्या षटकात दिल्लीला ६ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर हेटमायर आणि अक्षर पटेलने २ धावा काढल्या. पुढचा चेंडू ब्रावोने वाईड टाकला, ज्यावर त्यांनी एकेरी धाव पळून काढली. त्यामुळे ४ चेंडू २ धावा असे समीकरन झाले होते. षटकातच्या तिसऱ्या चेंडूवर ब्रावोने अक्षरला ५ धावांवर बाद केले. पण चौथ्या चेंडूवर कागिसो रबाडाने चौकार ठोकत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हेटमायरने नाबाद २८ धावा केल्या.
चेन्नईकडून रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच ड्वेन ब्रावो, दीपक चाहर आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी १ विकेट घेतली.
अंबाती रायडूचे झुंजार अर्धशतक
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरले. चेन्नईकडून फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडने डावाची सुरुवात केली. हे दोघेही सुरुवातीपासून चांगल्या लयीत दिसत होते. पण, दुसऱ्याच चेंडूवर ऋतुराज बाद होताहोता वाचला. कागिसो रबाडाने टाकलेला चेंडू त्याच्या पॅडला लागला होता. ज्यावर दिल्लीने अपील केले आणि मैदानावरील पंचांनीही बाद दिले. मात्र, ऋतुराजने डीआरएस रिव्ह्यू घेतला, ज्यात तो नाबाद असल्याचे दिसले, त्यामुळे पंचांना त्याला पुन्हा नाबाद घोषित करावे लागले.
पण, नंतर तिसऱ्या षटकात फाफ डू प्लेसिसला अक्षर पटेलने १० धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ ५ व्या षटकात ऋतुराज गायकवाड देखील १३ धावांवर एन्रीच नॉर्किएच्या गोलंदाजीवर बाद झाला झाला. पण, यानंतर रॉबिन उथप्पाने मोईन अलीला साथीला घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अक्षर पटेलने ८ व्या षटकात मोईन अलीला बाद करत चेन्नईला तिसरा धक्का दिला. मोईन अली ५ धावांवर बाद झाला. पाठोपाठ ९ व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या आर अश्विनला त्याच्या चेंडूवर रॉबिन उथप्पाने १९ धावांवर झेल दिला. त्यामुळे चेन्नईला १० षटकांच्या आतच चौथा धक्का बसला.
यानंतर अंबाती रायडू आणि एमएस धोनी यांनी सुरुवातीला संयमी खेळी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. रायडूने अखेरच्या षटकांमध्ये आक्रमण केले. त्याने १९ व्या षटकात त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पण, अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एमएस धोनीला अवेश खानने बाद केले. धोनीने २७ चेंडूत १८ धावा केल्या. अखेर चेन्नईने २० षटकात ५ बाद ११६ धावा केल्या. रायडू ४३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावा करुन नाबाद राहिला. तर, रविंद्र जडेजा १ धावेवर नाबाद राहिला.
दिल्लीकडून अक्षर पटेलने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच एन्रीच नॉर्किए, अवेश खान आणि आर अश्विनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
असे आहेत दोन्ही संघ
या सामन्यातून दिल्लीकडून रिपल पटेलने आयपीएल पदार्पण केले आहे. त्याला स्टिव्ह स्मिथऐवजी ११ जणांच्या संघात संधी मिळाली आहे.
तसेच चेन्नईने या सामन्यासाठी ११ जणांच्या संघात काही बदल केले आहेत. चेन्नईकडून रॉबिन उथप्पा पदार्पण करत आहे. त्याला सुरेश रैनाऐवजी संधी मिळाली आहे. तसेच ड्वेन ब्रावो आणि दीपक चाहर यांचे संघात पुनरागमन झाले आहे. ब्रावोला सॅम करनऐवजी, तर चाहरला केएम असिफऐवजी संधी मिळाली आहे.
#DelhiCapitals have won the toss and they will bowl first against #CSK.
Live – https://t.co/zT4bLrVdAV #DCvCSK pic.twitter.com/yLUCBD6Pch
— IndianPremierLeague (@IPL) October 4, 2021
असे आहेत ११ जणांचे संघ
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), रिपल पटेल, अक्षर पटेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, एन्रिच नॉर्किए.
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जोश हेजलवुड