---Advertisement---

मला कोणतीही जबाबदारी द्या मी ती शंभर टक्के पूर्ण करतो – अजिंक्य रहाणे

On: शुक्रवार, ऑगस्ट 28, 2020 10:50 AM
---Advertisement---

मुंबई । भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकारात म्हणजे टी 20 मध्ये सलामीला खेळणे आवडते. पण दिल्ली कॅपिटल्स संघ त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेऊ शकतो. दिल्ली कॅपिटल्सच्या संघात सलामीला खेळणारे अनेक फलंदाज आहेत. ज्यामुळे अजिंक्य रहाणे सलामीला खेळण्याची शक्यता कमी आहे.

यंदा दिल्लीच्या संघात अजिंक्य रहाणे सलामीवीर ऐवजी फिनिशरची भूमिका बजावताना दिसू शकतो. यासाठी तो पूर्णपणे तयारी करत आहे. दिल्लीच्या कॅपिटल्सच्या संघात टॉप ऑरर्डरमध्ये शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शिमरोन हेटमियर आणि रिषभ पंत हे या संघात असल्याने रहाणेला सलामीला स्थान मिळविणे अवघड आहे.

रहाणेला संघात त्याच्या भूमिकेबद्दल विचारले गेले, तो म्हणाला, ”मला माहित नाही. आपल्याला थोडी वाट पहावी लागेल. कारण आता सराव सत्र सुरू होईल आणि त्यानंतर त्यावर चर्चा होईल.  मी माझ्या कारकिर्दीत सलामीलाच खेळलो आहे. मी त्याचा पूर्ण आनंद घेतला. पण मला संघात काय भूमिका द्यायची आहे. हे टीम मॅनेजमेंटवर पूर्णपणे अवलंबून असेल. मी ती भूमिका शंभर टक्के साकारणार आहे.”

फिनिशरची भूमिका करण्यास सज्ज

टी -20 मध्ये फिनिशरची भूमिका साकारण्यासाठी आपण तयार असल्याचे अजिंक्य रहाणेनी सांगितले.  टी20 क्रिकेटमध्ये 196 सामन्यांत 4988 धावा करणारा रहाणे म्हणाला, ”जर मला पाच किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगितले गेले असेल तर मला नक्कीच ते करायला आवडेल. कारण ते माझ्यासाठी नवीन भूमिका असेल आणि यामुळे माझा खेळ विस्तारण्यास मला मदत होईल. यासंबंधी जर तुम्ही मला विचारले तर माझे उत्तर होय असेल, मी तयार आहे.!”

रहाणेचा आयपीएल मधील आकडेवारी

अजिंक्य रहाणेने आयपीएलमध्ये 140 सामन्यांत 32.93 च्या सरासरीने 3820 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 121.92 आहे. त्याने दोन शतके लगावली आहेत. तसेच त्याने 27 वेळा अर्धशतके ठोकली आहेत.

रहाणेला विश्वचषक न खेळण्याची खंत

अजिंक्य रहाणे अजूनही गेल्या वर्षी विश्वचषकात संघाचा भाग न झाल्याबद्दल निराश आहे. तो म्हणाला, ”मला विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडली असती पण ही संधी मिळाली नाही. पण ही आता पूर्वीची गोष्ट आहे. वनडे संघात पुनरागमन करणे आणि चांगले प्रदर्शन करणे हे ध्येय आहे.”

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---