---Advertisement---

अरुण जेटली स्टेडियमवर गौतम गंभीरने केले स्वतःच्या स्टँडचे उद्घाटन, पहा फोटो

On: बुधवार, नोव्हेंबर 27, 2019 6:18 PM
---Advertisement---

फिरोजशाह कोटला मैदानावरील अरुण जेटली स्टेडियमवर मंगळवारी (26 नोव्हेंबर) गौतम गंभीर नावाच्या या स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे या स्टॅंडचे अनावरण खूद्द माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेच(Gautam Gambhir) केले.

दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) सचिव विनोद तिहरा (Vinod Tihra), उपाध्यक्ष राकेश बंसल (Rakesh Bansal), राजन मनचंदा (Rajan Manchanda) यांच्यासह अनेक अधिकारी या वेळी उपस्थित होते.

गंभीरने या सोहळ्याचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. तसेच याला कॅप्शन दिले आहे की “अरुण जेटली जी माझ्या वडिलांसारखे होते आणि अरुण जेटली स्टेडियमवर माझ्या नावाने एक स्टॅंड उभे राहणे हे माझ्यासाठी अभिमान आणि आनंदाची गोष्ट आहे.”

“माझ्या आयुष्यात प्रत्येक वेळी मला पाठिंबा देणाऱ्या अपेक्स काऊंसिल, माझे चाहते, मित्र आणि कुटुंबीय यांचे आभार मानतो,” असेही गंभीर म्हणाला.

 

 

1999-2018 दरम्यान गंभीरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 198 प्रथम श्रेणी सामने, 299 ‘अ’ दर्जाचे सामने आणि 251 टी20 सामने खेळले आहेत. गंभीरने प्रथम श्रेणीमध्ये 15153 धावा आणि ‘अ’दर्जाच्या क्रिकेटमध्ये 10077 धावा केल्या आहेत.

रणजी करंडक  2007-08 च्या अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात 38 वर्षीय गंभीरने दिल्लीसाठी 130 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीने दिल्लीच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

त्याशिवाय गंभीरने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दिल्ली डेअरडेव्हिल्सचे (आताचे दिल्ली कॅपिटल) आणि कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले. तसेच त्याने कोलकाता नाईट रायडर्सने नेतृत्व करताना संघाला 2 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आहे.

त्याचबरोबर श्रीलंकेविरुद्ध 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने केलेल्या 97 धावांची खेळी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात नेहमी राहील.

2009 मध्ये गंभीरला आयसीसीचा कसोटी खेळाडू (ICC Test Player of the Year) म्हणून गौरविण्यात आले होते. गंभीरने 10326 आंतरराष्ट्रीय धावा केल्यावर 2018 मध्ये निवृत्ती घेतली.

गंभीरबरोबरच याआधी अरुण जेटली स्टेडियमवरील पॅव्हेलियनला सप्टेंबरमध्ये विराट कोहलीचे नाव देण्यात आले होते. तसेच या स्टेडियमवर माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी आणि मोहिंदर अमरनाथ यांच्या नावाचेही स्टँड आहेत.

तसेच या स्टेडियमच्या गेटला भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि भारताची माजी महिला क्रिकेटपटू अंजूम चोप्रा यांचे नाव देण्यात आली आहेत. तसेच हॉल ऑफ फेमला माजी भारतीय कर्णधार मन्सुरअली पतौडी यांचे नाव देण्यात आले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---