12 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी आज(8 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनचे संघात पुनरागमन झाले आहे.
स्टेनने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मागीलवर्षी मार्चमध्ये खेळला आहे. तो मागील काही महिन्यांपूर्वी दुखापतीमुळे त्रस्त होता. त्याला खांद्याच्या दुखापतीमुळे 2019 विश्वचषकातूनही एकही सामना न खेळता बाहेर पडावे लागले होते.
त्यानंतर त्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटवर लक्ष्य केंद्रित करण्यासाठी ऑगस्टमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
यानंतर त्याने मझांसी सुपर लीग आणि बीग बॅश लीगमध्ये चांगली कामगिरी करत त्याची तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. त्याने मझांसी सुपर लीगमध्ये 15.13 च्या इकोनॉमी रेटने 15 विकेट्स घेतल्या. तर बीग बॅश लीगमध्ये त्याने 4 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आता त्याचे दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन झाले आहे.
तसेच दक्षिण आफ्रिकेने नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांच्या विश्रांतीच्या कालावधीत वाढ केली असल्याने त्यांचा इंग्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघ निवड करताना विचार केलेला नाही.
डू प्लेसिस ऐवजी क्विंटॉन डी कॉककडे इंग्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व सोपवले आहे. डीकॉकला काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या वनडे संघाचे नियमित कर्णधारपद देण्यात आले आहे.
त्याचबरोबर या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने फलंदाज पिट व्हॅन बिलजॉन आणि गोलंदाज सिसांडा मॅगाला यांना पहिल्यांदाच संघात स्थान दिले आहे.
https://twitter.com/OfficialCSA/status/1226042247961088001
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघातील टी20 मालिकेतील पहिला सामना 12 फेब्रुवारीला इस्ट लंडन येथे होईल. तर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 14 आणि 16 फेब्रुवारीला डर्बन आणि सेंच्यूरियन येथे होईल.
असा आहे दक्षिण आफ्रिकेचा टी20 संघ –
क्विंटन डी कॉक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, तेंबा बावुमा, रस्सी व्हॅन डर दसेन, डेव्हिड मिलर, पिट व्हॅन बिलजॉन, ड्वेन प्रिटोरियस, अॅन्डिले फेहलूक्वायो, जॉन-जॉन स्मट्स, ब्युरान हेंड्रिक्स, ताब्राइज शम्सी, लुंगी एन्गिडी, सिसांडा मॅगाला, बीजोर्न फोर्च्यून, डेल स्टेन, हेन्रिक क्लासेन.
https://twitter.com/Maha_Sports/status/1226136246545608704
https://twitter.com/Maha_Sports/status/1226128773214433280