आयपीएल 2024 चा विजेतेपदाचा सामना आज (26 मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे.
आयपीएल 2009 चं विजेतेपद डेक्कन चार्जस हैदराबादनं पटकावलं होतं. तर 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादची टीम चॅम्पियन बनली होती. आता तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की, डेक्कन चार्जर्स हैदराबाद आणि सनरायझर्स हैदराबाद हे एकच संघ आहेत की वेगवेगळे? चला तर मग याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
इंडियन प्रीमियर लीगला 2008 मध्ये सुरुवात झाली. त्यावेळी डेक्कन चार्जर्स हैदराबादचा संघ होता. तेव्हा संघाची मालकी डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्स लिमिटेड आणि गायत्री रेड्डी यांच्याकडे होती. डेक्कन चार्जर्समध्ये अनेक स्टार खेळाडू होते. ऑस्ट्रेलियाच्या ॲडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली हा संघ 2009 मध्ये चॅम्पियन बनला होता.
मात्र, दुसऱ्याच हंगामात विजेतेपद पटकावूनही डेक्कन चार्जर्सचा आयपीएलमधील प्रवास फार काळ टिकू शकला नाही. 2012 साली संघ विसर्जित झाला. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलनं कराराच्या अटींचं उल्लंघन केल्याबद्दल डेक्कन चार्जर्स फ्रँचायझी संपुष्टात आणली.
यानंतर, 2012 मध्ये, सन टीव्हीनं हैदराबाद फ्रँचायझीसाठी बोली जिंकली आणि बीसीसीआयनं 25 ऑक्टोबर 2012 रोजी नवीन आयपीएल संघ ‘सनरायझर्स हैदराबाद’ची घोषणा केली. सनरायझर्स हैदराबादनं 2013 च्या हंगामात पदार्पण केलं. या संघाची मालकीण काव्या मारन आहे, जी जवळपास प्रत्येक सामन्यात खेळाडूंना चिअर करताना दिसते.
सनरायझर्स हैदराबादनं 2016 मध्ये पहिल्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावलं. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली संघानं अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला होता. सनरायझर्सनं 2016 ते 2020 अशी सलग पाच वर्षे आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. मात्र, यानंतर संघाची कामगिरी विशेष राहिली नाही. आता हा संघ आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये पोहचला आहे. सध्या या संघाची धुरा ऑस्ट्रेलियाचा अनुभवी पॅट कमिन्सकडे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल फायनलमध्ये भारतीय खेळाडूंचंच वर्चस्व! आतापर्यंत इतक्या सामन्यांत जिंकलाय सामनावीराचा पुरस्कार
आयपीएलच्या इतिहासात फक्त 3 विदेशी कर्णधारांनी पटकावलं विजेतेपद! पॅट कमिन्स रचणार का इतिहास?