वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (२० फेब्रुवारी) खेळला गेला. भारताने हा सामना १७ धावांनी जिंकला आणि मालिकेत ३-० असा विजय मिळवला. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील खराब प्रदर्शनानंतर भारतीय संघासाठी हा विजय महत्वाचा ठरला आहे.
असे असले तरी, वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) शेवटच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला, ज्यामुळे संघाला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेतून तो माघार घेण्याची शक्यता आहे. याबरोबरच आयपीएललाही तो मुकू शकतो.
वेस्ट इंडीजला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत क्लीन स्वीप (३-०) दिल्यानंतर भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. परंतु आगामी टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी घटना घडली आहे. दीपक चाहरच्या पायाचे हॅमस्ट्रिंग दुखावले गेले आहे आणि या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी त्याला मोठा काळ लागू शकतो. अशात तो श्रीलंकेविरुद्ध २४ फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी उपस्थित राहिल, याची खूपच कमी शक्यता आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या या तिसऱ्या टी-२० सामन्यात दीपक चाहरचे हॅमस्ट्रिंग दुखावले गेले. या सामन्यात चाहरने त्याच्या पहिल्या षटकात कायल मेयर्स आणि दुसऱ्या षटकात शाई होप या महत्वाच्या विकेट्स घेतल्या. पण दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वी त्याला ही दुखापत झाली आणि अष्टपैलू वेंकटेश अय्यरने षटकातील राहिलेला एक चेंडू टाकला. पाचवा चेंडू टाकताना रनअपवेळी त्याला अडथळा आल्याचे दिसले आणि तो लंगडताना दिसला. त्यानंतर फिजिओ मैदानात धावले आणि चाहरला सामन्यातून माघार घ्यावी लागली.
श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेसोबतच चाहर आता आगामी आयपीएलमध्ये खेळेल याचीही खात्री देता येणार नाही. चाहरच्या दुखापतीची तपासणी सुरू आहे. जर ‘टीयर’ असला तर, चाहर आयपीएल २०२२ च्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. कारण हॅमस्ट्रिंग दुखापतीच्या ग्रेड १ टीयर ठीक होण्यासाठी आणि रिहॅबिलिटेशनसाठी ६ आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी जातो. अशात आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जचीही चिंता वाढली आहे. चेन्नईने आयपीएल मेगा लिलावात चाहरला तब्बल १४ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या –
क्रिकेट खेळण्यासाठी तरसतोय रैना, ‘अनसोल्ड’ राहिल्यानंतर बीसीसीआयकडे केली इमोशनल अपील
‘हिटमॅन’ टी२०मध्ये व्हाईटवॉशचा ‘मास्टर’! कर्णधार रोहितची ‘ही’ आकडेवारी पाहून बसेल विश्वास
महागुरू द्रविडने कमी केला होता पदार्पणवीर आवेश खानवरचा दबाव, दिला होता ‘हा’ झक्कास मंत्र