आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत रविवारी (३१ ऑक्टोबर) दोन रोमांचक सामने पार पडले. पहिला सामना अफगानिस्तान आणि नामिबिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात अफगानिस्तान संघाने अप्रतिम कामगिरी करत नामिबिया संघाला ६२ धावांनी पराभूत केले. हा सामना अफगानिस्तान संघाचा माजी कर्णधार असगर अफगानच्या टी -२० कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. दरम्यान हा सामना झाल्यानंतर त्याने एक मोठा खुलासा केला.
अफगानिस्तान विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सामना झाल्यानंतर असगर अफगानने पुढील सामन्यात म्हणजे नामिबिया संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात निवृत्ती जाहीर करत असल्याची घोषणा केली होती. पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर असगर अफगान आणि संघातील इतर खेळाडू निराश झाले होते. त्यामुळे त्याने टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू असताना निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अफगानिस्तान संघाला ५ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात शेवटच्या २ षटकात पाकिस्तान संघाला विजयासाठी २४ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी आसिफ अलीने ४ षटकार मारून पाकिस्तान संघाला विजय मिळवून दिला होता. हा सामना झाल्यानंतर असगर अफगानने निवृत्ती जाहीर करण्याची घोषणा केली होती.
अफगानिस्तान विरुद्ध नामिबिया यांच्यात झालेल्या सामन्यातील पहिला डाव संपल्यानंतर असगर अफगान अश्रू पुसत म्हणाला की, “गेल्या सामन्यानंतर आम्हाला खूप दुःख झाले. त्यामुळे मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. क्रिकेटसी संबंधित खूप आठवणी आहेत, हे माझ्यासाठी कठीण होते. पण मला निवृत्ती घ्यावी लागली.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला युवा खेळाडूंना खेळण्याची संधी द्यायची आहे. मला असे वाटते की, हीच एक योग्य संधी आहे. अनेकांनी मला प्रश्न विचारले की, असे का? परंतु ही एक अशी गोष्ट आहे ज्याचे मी उत्तर देऊ शकत नाही.” ११५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अफगानिस्तान संघाचे नेतृत्व करणाऱ्या असगर अफगानच्या नावे सर्वाधिक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून देण्याचा विक्रम आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
केन विलियम्सनने सांगितला आपला मास्टरप्लॅन, ‘या’ रणनितीसह भारतावर मिळवला एकतर्फी विजय
पहिल्याच चेंडूवर झेलबाद होण्यापासून वाचला रोहित, रितीकाच्या जीवात आला जीव; पाहा रिऍक्शनचा व्हिडिओ
श्रीलंकन टायगर्स थांबवणार का इंग्लंडचा विजयरथ? आज दोन्ही संघांमध्ये रंगणार अटीतटीची लढत