आयसीसी महिला टी-20 (ICC T20 Women’s World Cup 2026) विश्वचषकाला 12 जूनपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत टीम इंडिया आपला पहिला सामना 14 जूनला पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) खेळणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. या सामन्यात भारताची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माकडे (Deepti Sharma) एक विशेष विक्रम करण्याची संधी आहे.
दीप्ती शर्मा भारत-पाकिस्तान टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज बनू शकते. हा विक्रम नावावर करण्यासाठी तिला केवळ दोन विकेट्सची गरज आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान महिला टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम भारताची ‘एकता बिष्ट’ आणि पाकिस्तानची ‘निदा डार’ यांच्या नावावर आहे. या दोघांनीही आतापर्यंत प्रत्येकी 10 विकेट्स घेतल्या आहेत. दीप्ती शर्माने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे जर ती रविवारी होणाऱ्या सामन्यात 2 विकेट्स घेते, तर ती या दोन्ही देशांमधील टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी अव्वल गोलंदाज ठरेल. पाकिस्तानची सना मीर हिनेही 9 विकेट्स घेतल्या आहेत, पण तिने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक टी-20 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत एकता बिष्ट आणि दीप्ती शर्मा यांच्यानंतर प्रियंका रॉय (8 विकेट्स) तिसऱ्या क्रमांकावर आहे. अनुजा पाटिल (7 विकेट्स) चौथ्या क्रमांकावर आहे. तर पूनम ठाकुर, रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकर या प्रत्येकी 5 विकेट्स घेऊन पाचव्या क्रमांकावर आहेत.
टी-20 विश्वचषक 2026 मधील भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. या स्पर्धेत हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत, त्यामुळे भारतीय संघ विजयाने स्पर्धेची शानदार सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात स्मृती मंधाना (Smriti Mandhana & Harmanpreet Kaur) आणि हरमनप्रीत कौर यांच्या कामगिरीकडे सर्वांचे विशेष लक्ष असेल. आता या मोठ्या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.






