टी२० विश्वचषकात शुक्रवारी(५ नोव्हेंबर) भारत आणि स्कॉटलंडमध्ये झालेल्या सामन्यात भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारताने सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटाच्या गुणतालिकेत दोन अंकाने आघाडी घेतली आहे आणि अफगाणिस्तानला मागे टाकले आहे. भारत सध्या गुणतालिकेत तिसऱ्या आणि अफगाणिस्तान चौथ्या स्थानावर घसरला आहे.
पाकिस्तानने याआधीच उपांत्य सामन्यासाठी त्याचे स्थान पक्के केले, असून भारतासमोर आता उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे आव्हान आहे. रविवारी (७ नोव्हेंबर) न्यूझीलंड संघ अफगाणिस्तान संघासोबत भिडणार आहे आणि हा सामना भारतीय संघाचा टी२- विश्वचषकातील पुढचा प्रवास ठरवणार आहे.
भारताला त्याचा सुपर १२ मधील शेवटचा सामना सोमवारी (८ नोव्हेंबर) नामिबियाविरुद्ध खेळायचा आहे. मात्र, याआधी अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये होणारा सामना भारतीय संघाचे स्पर्धेतील पुढचे चित्र स्पष्ट करणार आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने न्यूझीलंडने हा सामना गमावला, तर फायदा होणार आहे.
जर न्यूझीलंडने या सामन्यात विजय मिळवला, तर भारतीय संघ स्पर्धेतून बाद होईल. कारण न्यूझीलंडचे गुण जास्त असल्यामुळे ते उपांत्य सामन्यात पोहचतील. जर अफगाणिस्तान संघ जिंकला, तर भारताकडे उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी संधी असणार आहे. त्यानंतर भारताला नामिबियाला पराभूत करावे लागणार आहे.
जर अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर विजय मिळवला आणि नंतर भारतीय संघ नामिबियाविरुद्धच्या सामन्यात विजयी झाला, तर ग्रुप दोनमधील तीन संघांकडे ६ गुण असतील. अशात भारतीय संघ नेट रन रेटच्या मदतीने इतर दोन संघांना पिछाडीवर टाकू शकतो आणि उपांत्य सामन्यात स्थान पक्के करू शकतो.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या भारत आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंड संघ १७.४ षटकात आणि ८५ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ६.३ षटकांमध्ये स्कॉटलंडने दिलेले लक्ष्य गाठले आणि सामना दोन विकेट्सच्या नुकसानावर जिंकला.
सध्या भारताचा नेट रन रेट +१.६१९ झाले आहे आणि ग्रुप दोनमध्ये हा सर्वश्रेष्ठ आहे. अफगाणिस्तनाला गुणतालिकेत मागे टाकण्यासाठी स्कॉटलंडविरुद्ध ७.१ षटकांमध्ये विजय मिळवणे भारताला आवश्यक होते, जे भारताने शक्य करून दाखवले आहे. अशात जर उपांत्य सामन्यासाठी नेट रन रेटचा विचार केला गेला, तर भारतासाठी हे फायद्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तर मग, बॅग पॅक करणार आणि घरी जाणार’, पत्रकाराच्या प्रश्नावर जडेजाचे भन्नाट उत्तर, पाहा व्हिडिओ
केएल राहुलचा धमाका! केवळ १८ चेंडूत अर्धशतक करत ‘या’ विक्रमात मिळवले युवराजनंतर दुसरे स्थान
वाढदिवशी विराटने जिंकला टॉस अन् नावावर झाला अनोखा विक्रम; रिचर्ड्स, स्मिथच्या पंक्तीत सामील