आयपीएलमध्ये बुधवारी (14 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला 13 धावांनी पराभूत केले. मात्र या सामन्यादरम्यान दिल्लीला एक मोठा धक्का बसला. त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यर क्षेत्ररक्षण करत असताना दुखापतग्रस्त झाला आहे.
राजस्थान रॉयल्स दिल्लीने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना सलामीवीर बेन स्टोक्सने पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक जोरदार फटका मारला. हा फटका रोखण्याचा प्रयत्नात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने डाइव्ह मारून संघासाठी तीन धावा वाचवल्या, पण त्याचवेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो मैदानातून बाहेर गेला आणि धवनने संघाचे नेतृत्व केले. अय्यरच्या खांद्याला दुखापतीबद्दल सामन्यानंतर शिखर धवनने महत्वाची माहिती दिली आहे.
सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात धवन म्हणाला, “श्रेयसला वेदना होत आहेत. पुढील काही दिवसात दुखापतीबद्दल अधिक माहिती मिळेल. चांगली गोष्ट म्हणजे तो त्याचा खांद्याची हालचाल करू शकत आहे.”
याआधी दिल्लीचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे किमान आठवड्यासाठी संघातून बाहेर पडला आहे. तसेच फिरकीपटू अमित मिश्रा आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हे दोघेही दुखापतींमुळे आयपीएलच्या या हंगामातूनच काही सामने खेळल्यानंतर बाहेर पडले आहेत.
विजयाची होती खात्री
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 161 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थान रॉयल्सला फक्त 148 धावा करता आल्या आणि दिल्लीने 13 धावांनी विजय मिळवला. सामन्याबद्दल बोलताना धवन म्हणाला की, “राजस्थान संघाकडे जास्त फलंदाज नाहीत. त्यामुळे सामना जिंकण्याची आमच्याकडे चांगली संधी होती. विजय मिळवू, असा आम्हाला विश्वास होता. वरच्या फळीतील फलंदाजांना लवकर बाद करून सामना जिंकू शकतो याची मला खात्री होती.”
नॉर्किए आणि देशपांडे यांचे केले कौतुक
सामनावीर एन्रीच नॉर्किए आणि पहिला सामना खेळणारा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे यांचे कौतुक करताना धवन म्हणाला, “आमच्याकडे अनुभवी गोलंदाज आहेत. नॉर्किए हा एक उत्तम वेगवान गोलंदाज आहे. तुषारनेसुद्धा चांगली गोलंदाजी केली.”
या दोन्ही गोलंदाजांनी टाकलेल्या प्रत्येकी चार षटकांत नॉर्किएने 33 धावा तर देशपांडेने 37 धावा दिल्या. या दोघांनीही प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले.
नॉर्किएने फेकला आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू
नॉर्किएने सामन्यादरम्यान ताशी 156 किमी च्या वेगाने एक चेंडू फेकला. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी ताशी 156 किमीच्या वेगाने गोलंदाजी केली आहे, हे मला माहिती नाही. हे ऐकून छान वाटले. वेगवान गोलंदाजी करताना मी यष्टीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत होतो. आमच्याकडे चांगले प्रशिक्षक आहेत. कागिसो रबाडा आणि इतर वेगवान गोलंदाजांना ते उत्तम प्रशिक्षण देत आहेत.”
राजस्थान संघाने केली खराब कामगिरी
राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ या पराभवामुळे निराश होता. सामन्यानंतर तो म्हणाला की, “सलामीवीर जॉस बटलर आणि बेन स्टोक्स यांनी डावाची चांगली सुरुवात केली, मात्र आम्ही त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. आमच्या संघाने खराब कामगिरी केली. खेळपट्टी गोलंदाजीसाठी उपयुक्त होती. स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनीही चांगली भागीदारी केली पण त्यानंतर आम्ही लवकर बळी गमावले याचा फटका आम्हाला बसला. अशा संथ खेळपट्ट्यांवर धावा करणे कठीण आहे. संघातील एका फलंदाजाला डावाच्या अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून खेळायचे होते.”