दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा दुसरा सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली संघाच्या फलंदाजांनी अफलातून फलंदाजी करत सामना ४ विकेट्सने जिंकला. नेहमीप्रमाणे मुंबई संघ आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पराभूत झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय दिल्लीच्या फलंदाजांनी योग्य ठरवला.
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी मुंबईने निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १७७ धावांचा डोंगर उभा केला होता. तसेच, दिल्लीला १७८ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, दिल्लीच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत हे आव्हान १८.२ षटकात ४ विकेट्स राखत पार केले.
यावेळी दिल्लीकडून फलंदाजी करताना ललित यादवने सर्वाधिक धावांची खेळी केली. त्याने नाबाद ४८ धावा केल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ४ चौकारही ठोकले. तसेच, युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि अक्षर पटेलने प्रत्येकी ३८ धावा केल्या. दुसरीकडे टीम सेफर्ट आणि शार्दुल ठाकूर यांनी अनुक्रमे २१ आणि २२ धावा केल्या. तसेच, मनदीप सिंग आणि रोवमन पॉवेल यांना भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार रिषभ पंत तर अवघ्या १ धावेवर तंबूत परतला.
यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना बेसिल थंपीने ४ षटके गोलंदाजी करताना ३५ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मुरुगन अश्विन आणि टायमल मिल्स यांनी अनुक्रमे २ आणि १ विकेट खिशात घातली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सकडून यष्टीरक्षक इशान किशनने नाबाद सर्वाधिक ८१ धावा केल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ११ चौकार ठोकले. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्माने ४१ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त तिलक वर्मा आणि टीम डेविड यांनी अनुक्रमे २२ आणि १२ धावा केल्या. इतर फलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही.
यावेळी दिल्लीकडून गोलंदाजी करताना चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ४ षटके गोलंदाजी करताना त्याने १८ धावा दिल्या. त्याच्याव्यतिरिक्त खलील अहमदने २ विकेट्स घेतल्या.
आयपीएलच्या १५व्या हंगामातील तिसरा सामना रविवारी (२७ मार्च) पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
MI vs DC: दिल्लीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; मुंबईकडून ५ खेळाडूंचे पदार्पण
अर्रर्र! मागील १० हंगामांपासून मुंबई इंडियन्स ‘या’ गोष्टीत ठरतोय फ्लॉप; वाचून तुम्हालाही बसेल शॉक