---Advertisement---

लिव्हिंगस्टोनची झुंज अपयशी, दिल्लीच्या वेगवान माऱ्यापुढे पंजाबचा निसटता पराभव, प्ले-ऑफमधूनही बाहेर

On: बुधवार, मे 17, 2023 11:22 PM
Liam-Livingstone
---Advertisement---

बुधवारी (दि. 17 मे) आयपीएल 2023चा 64वा सामना पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने 15 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दिल्लीच्या या विजयात फलंदाज आणि गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. या हंगामातील दिल्लीचा हा पाचवा विजय होता. तसेच, दिल्लीने पंजाब किंग्सचे प्ले-ऑफच्या शर्यतीत पोहोचण्याच्या आशा जवळपास धुळीस मिळवल्या.

या सामन्यात पंजाब किंग्स संघाचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाच्या फलंदाजांनी स्पष्टपणे चुकीचा ठरवला. यावेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात फक्त 2 विकेट्स गमावत तब्बल 213 धावांचा डोंगर उभारला. दिल्लीच्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावत 198 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना दिल्लीने 15 धावांनी खिशात घातला.

लिव्हिंगस्टोनची विस्फोटक खेळी व्यर्थ
आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खूपच खराब झाली. पंजाबला दुसऱ्याच षटकातील पहिल्या चेंडूवर कर्णधार शिखर धवन एक चेंडू खेळत शून्यावर तंबूत परतला. त्यानंतर सलामीवीर प्रभसिमरन सिंग (22 धावा) आणि अथर्व तायडे यांच्यात 50 धावांची भागीदारी झाली. प्रभसिमरन बाद झाल्यानंतर अथर्वला लियाम लिव्हिंगस्टोन याची साथ मिळाली. त्यांनी 50 चेंडूत 78 धावांची भागीदारी रचली. यावेळी अथर्व तायडे 55 धावांवर खेळत असतानाच रिटायर्ड आऊट होऊन तंबूत परतला. त्यानंतर जितेश शर्मा हादेखील 3 चेंडू खेळून शून्यावर तंबूत परतला. याव्यतिरिक्त शाहरुख खान हादेखील 6 धावांवर बाद झाला. सातव्या स्थानी आलेला सॅम करनही 11 धावा करून बाद झाला. करननंतर फलंदाजीला आलेला हरप्रीत ब्रार हादेखील धावबाद होऊन तंबूत परतला. लियाम लिव्हिंगस्टोन हा शेवटपर्यंत टिकला. त्याने यादरम्यान 48 चेंडूत सर्वाधिक 94 धावा केल्या. या खेळीत 5 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. त्याची ही खेळी व्यर्थ ठरली.

यावेळी दिल्लीकडून गोलंदाजी करताना ईशांत शर्मा आणि एन्रीच नॉर्किया यांनी प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या. तसेच, खलील अहमद आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी 1 विकेट खिशात घातली.

रायली रुसोचा वादळी धमाका
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून रायली रुसो (Rilee Rossouw) याने वादळी धमाका केला. त्याने यादरम्यान 37 चेंडूत नाबाद 82 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 6 चौकार आणि 6 षटकारांची बरसात केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 221.62 इतका होता. त्याच्याव्यतिरिक्त पृथ्वी शॉ यानेही 38 चेंडूत 54 धावांचे योगदान दिले. तसेच, कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) यानेही 49 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त फिलिप सॉल्ट यानेही 14 चेंडूत नाबाद 26 धावांचे मोठे योगदान दिले. या चौघांच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीला 200 धावांचा टप्पा पार करण्यात मदत झाली.

यावेळी पंजाबकडून गोलंदाजी करताना फक्त एकाच गोलंदाजाला विकेट्स घेण्यात यश आले. तो गोलंदाज इतर कुणी नसून सॅम करन होता. करनने 4 षटके गोलंदाजी करताना 36 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवला. (delhi capitals won by 15 runs against Punjab Kings )

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL Breaking : 5 वर्षांनंतर घडला मोठा विक्रम! खलील अहमदने करून दाखवली भल्याभल्यांना न जमलेली कामगिरी
याला म्हणतात चित्त्याची चपळाई! हवेत झेप घेत एका कॅप्टनने पकडला दुसऱ्या कॅप्टनचा कॅच, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---