कोची। हिरो इंडियन सुपर लीगच्या पाचव्या मोसमात केरळा ब्लास्टर्सविरुद्ध कोचीतील नेहरू स्टेडियमवर दिल्ली डायनॅमोजने सामना १-१ असा बरोबरीत राखत एक गुण कमावला आहे. उत्तरार्धाच्या प्रारंभी सी. के. विनीतने ब्लास्टर्सचे खाते उघडले होते, पण सहा मिनिटे बाकी असताना अँड्रीया क्लाऊडेरोविच याने दिल्लीला बरोबरी साधून दिली.
ब्लास्टर्सची तीन सामन्यांतील दुसरी बरोबरी असून एका विजयासह त्यांचे पाच गुण झाले आहे. यामुळे त्यांनी गुणतालिकेत दुसरा क्रमांक गाठला आहे. दिल्लीचे दोन गुणांसह आठवे स्थान कायम राहिले.
घरच्या मैदानावर सर्वाधिक प्रोत्साहन मिळणाऱ्या संघांमध्ये ब्लास्टर्सची गणना होते. या लढतीला २९ हजार ९६२ प्रेक्षक उपस्थित होते. त्यांच्या साक्षीने घरच्या मैदानावर विजयाकडे ब्लास्टर्सची घोडदौड सुरु होती, पण अखेरच्या टप्यात बचावातील चुकांमुळे त्यांची कमाल तीन गुण वसूल करण्याची संधी हुकली.
या लढतीत दोन्ही संघांनी अनेक प्रयत्न केले. अखेर पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीची कोंडी उत्तरार्धात तिसऱ्याच मिनिटाला सुटली. एकूण ४८व्या मिनिटाला ब्लास्टर्सला कॉर्नर मिळाला. उजवीकडून स्लावीस्ला स्टोजानोविच याने बॉक्समध्ये चेंडू मारला, तो रोखण्यात दिल्लीची बचाव फळी अपयशी ठरली. चेंडू मॅटेज पॉप्लॅटनिकपाशी गेला. त्याने पुढे मारलेला चेंडू विनीतच्या डाव्या पायापाशी गेला. विनीतने मग दिल्लीचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोलो याला चकविले.
खाते उघडल्यानंतर केरळने काही प्रयत्न करीत दिल्लीवर दडपण ठेवले होते, पण दिल्लीनेही प्रयत्न सोडले नाहीत. ८४व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा बदली खेळाडू मॅटेज पॉप्लॅटनिक हेडिंगवर बचाव करू शकला नाही. त्यामुळे प्रीतम कोटलकडे चेंडू गेला. त्याने नेटसमोर फटका मारला. निकोला क्रॅमरेविचने उडी घेऊनही त्याला किकने चेंडू अडविता आला नाही. यामुळे मिळालेल्या संधीने अँड्रीयाने सोने केले.
पूर्वार्धात दोन्ही संघांनी बरेच प्रयत्न केले. यात दिल्लीचे प्रमाण जास्त होते. पहिला प्रयत्न ब्लास्टर्सने दुसऱ्या मिनिटाला नोंदविला, पण साहल अब्दुल समाद याने मारलेला क्रॉस शॉट डोरोन्सोरो याच्या अगदी जवळ गेला.
चौथ्या मिनिटाला दिल्लीला कॉर्नर मिळाला. लिलायनझुला छांगटे याला पेनल्टी क्षेत्रात संदेश झिंगन याने रोखले, पण त्याने अडविलेला चेंडू बाहेर गेला. त्यामुळे डावीकडून मिळालेला कॉर्नर रेने मिहेलीच याने घेतला. त्याने चांगला चेंडू मारला होता, पण रोमीओ फर्नांडीस टाचेने प्रयत्न करताना अचूकता साधू शकला नाही.
आठव्या मिनिटाला दिल्लीच्या मार्टी क्रेस्पीने मध्य रेषेपाशी चेंडूवर ताबा मिळवून डावीकडून चाल रचण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा पास स्वैर होता. दोन मिनिटांनी क्रेस्पीने डावीकडून चांगला क्रॉस पास दिला. नारायण दासने चेंडूवर ताबा मिळविला, पण तो टायमिंग साधू शकला नाही. ११व्या मिनिटाला छांगटे याने दिल्लीकडून आणखी एक प्रयत्न नोंदविला. डावीकडून त्याने १८ यार्ड बॉक्समध्ये प्रवेश करताना अप्रतिम कौशल्य दाखविले, पण झिंगनचा अडथळा तो पार करू शकला नाही. त्यामुळे छांगटेला चेंडू मागच्या बाजूला देणे भाग पडले.
१४व्या मिनिटाला दिल्लीला कॉर्नर मिळाला. मिहेलीच याने डावीकडून चेंडू मारला, पण त्यात अचूकता नव्हती. त्यामुळे ब्लास्टर्सच्या महंमद रकीप याने चेंडू बाहेर घालविला. पुन्हा मिळालेला कॉर्नर मिहेलीच यानेच घेतला, पण यावेळी सुद्धा त्याने खराब फटका मारला. दोन मिनिटांनी छांगटेने डावीकडून हवेत मारलेल्या चेंडूवर अँड्रीया क्लाऊडेरोविच याने हेडिंग केले, पण तोपर्यंत ऑफसाईडचा इशारा झाला.
ब्लास्टर्सचा पहिला चांगला प्रयत्न १८व्या मिनिटाला हालीचरण नर्झारी याने केला. त्याने लांबून केलेल्या प्रयत्नात मात्र अचूकता नव्हती. २२व्या मिनिटाला समदने पास दिल्यानंतर स्लावीस्ला स्टोजानोविच याला डोरोन्सोरोस चकविता आले नाही. २४व्या मिनिटाला छांगटेला डावीकडून रोखण्यात लालरुथ्थाराने यश मिळविले. त्याने हेडींगकरून चेंडू बाहेर घालविला.
२८व्या मिनिटाला दिल्लीची आणखी एक संधी गेली. नारायणने उजवीकडे कॉर्नर किक घेतली. त्याने नेटसमोर चेंडू मारला, पण ब्लास्टर्सचा गोलरक्षक नवीन कुमार याने चेंडू थोपविला. अँड्रीयाने संधी साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फटका स्वैर होता. दोन मिनिटांनी नारायणने डावीकडून घोडदौड करीत अँड्रीयाला बॉक्समध्ये पास दिला, पण यावेळी थेट हातात चेंडू आल्यामुळे नवीन सहज बचाव करू शकला.
३४व्या मिनिटाला सी. के. विनीत याने नर्झारीच्या पासवर घोडदौड केली, पण त्याने मारलेला चेंडू स्वैर होता. त्यामुळे गोल कीक मिळाली. लालरुथ्थाराने बॉक्समध्ये चांगला पास दिला, त्यावेळी विनीत मात्र अचूक किक मारू शकला नाही. चेंडू स्लावीस्लापाशी गेला, पण त्याने मारलेला चेंडू नेटच्या बाजूला लागला. ४१व्या मिनिटाला रोमीओने चेंडू मिळताच जियान्नी झुईवर्लून याला उत्तम संधी होती, पण त्याची किक स्वैर होती. ४३व्या मिनिटाला स्लावीस्ला याच्या पासवर विनीतचा ओव्हरहेड किकचा प्रयत्न फसला.
दुसऱ्या सत्राच्या सुरवातीलाच खाते उघडल्यानंतर ब्लास्टर्सने बरेच प्रयत्न केले. ५२व्या मिनिटाला समादच्या चालीवर सैमीनलेन डुंगल याने केलेले हेडिंग कमकुवत होते. त्यामुळे डोरोन्सोरो चेंडू सहज अडवू शकला.
५६व्या मिनिटाला विनीतने उत्तम पास दिल्यानंतर डुंगलने डाव्या पायाने मारलेला फटका थोडक्यात बाहेर गेला. त्यावेळी विनीतने बॉक्समधील स्लावीस्ला याला पास दिला असता तर चांगले ठरले असते, कारण तेव्हा त्याला मार्किंग नव्हते. 59व्या मिनिटाला समादने आणखी एकदा प्रयत्न केला. ६४व्या मिनिटाला मॅटेजच्या चालीवर विनीतची किक फसली.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत मुंबईविरुद्ध पुणे सिटीचा पराभव
–ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच खेळणार या संघाविरुद्ध टी २० सामना