दिल्ली। येथील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर पार पडलेली भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरी कसोटी प्रदूषणाच्या कारणावरून चांगलीच गाजली होती त्यामुळे आता आयसीसीने यामध्ये लक्ष घातले आहे.
दिल्लीत झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याचे नियोजन करणे योग्य होते की नाही याविषयी वैद्यकीय तज्ञ तपास करणार आहेत आणि या वादाविषयी आयसीसी फेब्रुवारीत होणाऱ्या बैठकीत चर्चा करणार आहे.
आयसीसीच्या निवेदनात असे म्हटले आहे की ” दिल्लीत खेळल्या गेलेल्या कसोटीची परिस्थिती आयसीसीने लक्षात घेतली आहे. तसेच भविष्यात अशी समस्या उद्भवू नये म्हणून वैद्यकीय समिती मार्गदर्शन करेल.”
२ डिसेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान झालेला हा सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंनी मास्क घालून क्षेत्ररक्षण केले होते. तसेच दोन्ही संघातील गोलंदाजांना या प्रदूषणाचा त्रास झाला होता.
अमेरिका दूतावासाच्या अधिकृत वेबसाईटनुसार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची सुरक्षित मर्यादापेक्षा १८ पेक्षा जास्त छोटे आणि हानीकारक प्रदूषित कण होते.
या विषयी पाऊले उचलताना बीसीसीआयने आधीच सांगितले आहे की, ” दिल्लीला नोव्हेंबर आणि डिसेंबर या प्रदूषित महिन्याच्या कालावधीत कोणतीही आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद देण्यापासून वगळण्यात आले आहे.”
त्याचबरोबर आयसीसीची वैद्यकीय समिती आयसीसीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना, जर कोणत्याही प्रकारची वैद्यकीय समस्या अंतरराष्ट्रीय क्रिकेटवर परिणाम करत असेल तर त्याविषयी शिफारस करेल.
तसेच ही समिती जे देश आयसीसीने मंजूर केलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत त्यांच्या वैद्यकीय योजनांचाही मूल्यांकन करू शकते.
तसेच आयसीसीने म्हटले आहे “या प्रदूषणाच्या मुद्यावर फेब्रुवारीच्या बैठकीत चर्चा होईल.”