इंडियन प्रीमियर लीग २०२०चा १६वा सामना शनिवारी (३ ऑक्टोबर) पार पडला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात हा सामना झाला. या सामन्यात दिल्ली संघाने १८ धावांनी विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली संघाने २० षटकात ४ विकेट्स गमावत २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता संघ २० षटकात ८ विकेट्स गमावत २१० धावाच करु शकला. त्यामुळे दिल्लीने सामना जिंकत हंगामातील तिसरा विजय नोंदवला.
दिल्लीच्या २२९ धावांच्या भलामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा फलंदाज नितीश राणाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५८ धावा जडल्या. तसेच ऑयन मॉर्गननेही १८ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. तर राहुल त्रिपाठी (३६ धावा) आणि शुबमन गिलनेही (२८ धावा) धावा केल्या. पण इतर फलंदाज जास्त चांगले खेळू शकले नाहीत.
दिल्ली संघाकडून गोलंदाजी करताना एनरिच नॉर्त्जेने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेलने २ आणि कागिसो रबाडाने व अमित मिश्रा यांच्या प्रत्येकी एक-एक विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.
तत्पुर्वी प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आलेल्या दिल्ली संघाकडून कर्णधार श्रेयस अय्यरने ३८ चेंडूत ८८ धावांची अफलातून खेळी केली. दरम्यान त्याने ७ चौकार आणि ६ षटकार ठोकले. तर सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉनेही ४१ चेंडूत ६६ धावा ठोकल्या. त्याच्याव्यतिरिक्त रिषभ पंतने ३८ धावा आणि शिखर धवनने २६ धावा केल्या.
कोलकाता संघाच्या गोलंदाजांना जास्त विकेट्स घेण्यात यश आले नाही. आंद्रे रसेलने ४ षटकात २९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती आणि कमलेश नागरकोटीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
काय योगायोग आहे राव.! बाद होणारा ‘तो’ आणि त्याला झेलबाद करणारे ‘दोघे’ जन्मलेत एकाच वर्षी
कोहलीच्या ‘विराट’ खेळीने राजस्थानची बत्ती गुल, पॉईंट टेबलमध्ये आरसीबी आली ‘या’ स्थानावर
अर्धशतक किंग! २० वर्षीय पडिक्कलने ‘या’ दिग्गजांना मागे टाकत मिळवली आघाडी, पाहा काय केलाय पराक्रम
ट्रेंडिंग लेख-
तुम्हाला माहितीये? ‘स्विंग का सुलतान’ असा लौकिक असलेल्या ‘या’ खेळाडूला धोनीनेच दिली होती संधी
अनुभवी खेळाडूंचा भरणा असणाऱ्या चेन्नईला लोळवणारा १९ वर्षांचा पोरगा, वाचा ‘त्याच्या’ संघर्षाची कहानी
आतापर्यंत आयपीएल २०२०मध्ये गोलंदाजांना धू धू धुणारे टॉप-१० फलंदाज, केल्यात सर्वाधिक धावा